नाशिक : नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बसचा बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. बसमध्ये १५ पेक्षा जास्त प्रवासी होते. प्रवाशांनी भरलेली बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. बस थेट दरीत कोसळली. आतापर्यंत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहेत. बसचालक देखील गंभीर जखमी झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
पालकमंत्री दादा भुसे पोहोचले अपघातस्थळी
या भीषण अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी पोहोचले. बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी बसचा अपघात झाला. सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी जखमींची विचारपूस केली. (Dada Bhuse on Saptshrungi Bus Accident) अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी ८.३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट ४०० फूट दरीत कोसळली.
प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय
प्रवाशांनी भरलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बस बुधवारी पहाटे सप्तश्रृंगी टेकड्यांजवळ दरीत कोसळली, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या बसमध्ये सुमारे १५ पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते, ज्यात बहुतांश पर्यटक आणि प्रसिद्ध सप्तशृंगी मंदिराला भेट देणारे यात्रेकरू होते. जखमी प्रवाशांना वणी आणि नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.