मानसिक आरोग्य : आज-काल नात्यांमध्ये दुरावा येणं ही अगदी सामान्य गोष्ट असल्यासारखी झाली आहे. मुलांच्या बरोबरीने जशा मुली शिकू लागल्या, कमवू लागल्या तसं प्रमाण अधिक वाढल आहे. कारण आत्मसन्मान हा स्त्रीलाही असतो तोच मुळात आजपर्यंत दाबला गेला होता. सहनशक्तीची मर्यादा आता कमी झाली आहे. त्यामुळे सातत्याने घटस्फोटाच्या तक्रारी वाढतच आहेत. आजच्या या लेखांमध्ये विशेष करून पती-पत्नीचा नात यावर काही टिप्स देणार आहे.
होतं नेमकं असं की धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या जीवनाच्या साथीदारालाच मुळात विसरून जातो. पैसा कमावणे आणि आराम या दोनच गोष्टी 24 तासांमध्ये विभागल्या जातात. पण यामध्ये नात्याला न मिळणारा वेळ आयुष्यातल्या ताणतणावामुळे एकमेकांवर होणारी चिडचिड आणि सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे एकमेकांचा आदर न करणे.
आता मुळात आदर करणे म्हणजे नेमकं काय हे पाहूयात
करिअरमध्ये चढ-उतार सुरूच असतात एखाद्याचा करिअर हे बक्कळ पैसा मिळवून देणारे पण सोबत ताण-तणाव घेऊन येणार असत तर एखाद्याच करिअर पैसा फार मिळवून देणार नसेल पण ताण-तणाव न देणार असतं. पण पैसा कमी कमवतो किंवा कमावते तसेच ताणतणाव जास्त घेतो या कारणाने एकमेकांवर टीकाटिप्पणी करणे सोडा.अपमान करणे सोडा.
पुरुषी अहंकारं जर तुम्हाला किचनमध्ये जाण्यास अडवत असेल तर ही तुमच्या नातेसंबंधांमध्ये यापुढे धोक्याची घंटा ठरू शकते. भलेही तुम्हाला संपूर्ण स्वयंपाक जमत नसेल पण आजही असे अनेक पुरुष आहेत ज्यांना अगदी हातामध्ये पाणी देणे, जेवणाचे ताट अंथरुणात हातात आणून देणे अशा गोष्टी लागतात यामुळे एकाच व्यक्तीवर ताण येतो. त्यामुळे भांडणाला नवीन तोंड फुटते. त्यामुळे किरकोळ गोष्टींची सवय लावून घ्या. जसे की हाताने पाणी घेणे, घरातील प्रमुख स्त्रीने घालून दिलेले काही नियम पाळणे.
अनेक स्त्रियांमध्ये अति स्वच्छतेचे वेड असते. प्रत्येक गोष्ट ही जागच्या जागी गेलीच पाहिजे, त्यात तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा घरामध्ये लहान मूल असेल तर घर अस्वच्छ राहणार नाही हे मनाला सांगून ठेवा. त्यातून मानसिक ताण वाढून त्याचा राग तुमच्या पार्टनरवर काढण्यापेक्षा एखादं काम नाही झालं तर सोडून द्यायला शिका.
दिवसातला अर्धा तासाचा वेळ का होईना एकमेकांना द्या, यामध्ये प्रेमापेक्षा एकमेकांच्या भावनांविषयी विचारा, जसे की आजचा दिवस कसा होता. एखादा ताण असेल तर त्यावर थोडी चर्चा करून मन मोकळं करा, जुन्या आठवणींच्या विश्वात रमायला शिका. एखादा कॉमेडी पिक्चर सोबत पहा किंवा अगदी पूर्ण दिवस कामकाज केल्यानंतर एखादी छोटी चक्कर सुद्धा तुमचं माईंड फ्रेश करू शकते आणि नातं खुलू शकत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात अगदी बेडरूममध्येही आणि समाजात वावरताना एकमेकांचे किती प्रेम आहे, यापेक्षा एकमेकांचा किती आदर आहे हे दाखवा. त्याने तुमच्या दोघांचं नातं भक्कमचं होणार नाही तर तुमच्या नात्यात कोणी फूट पाडायला देखील येऊ शकणार नाही.