महिषासूरमर्दिनी म्हणून ओळख असलेल्या आंबा मातेचा जागर करण्याचा सण म्हणजे नवरात्रोत्सव. या नवरात्रोत्सवात देवीची पूजा, अर्चा, आरती केल्यानंतर गरब्याचा ठेका धरला जातो. म्हणजेच हा सण भक्ती आणि उत्साहाचं प्रतिक आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? गरबा हा नवरात्रीतच का खेळला जातो? तर याबाबतची माहिती जाणून घेऊयात…
महिषासुर नावाच्या राक्षसाने पृथ्वीतलावर थैमान माजवले होते. याबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. महिषासुराने देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवीने त्याला अट घातली की जर महिषासुराने तिला युद्धात हरवले तरच ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर झालेल्या युद्धात देवीने त्याचा पराजय करून त्याचा वध केला.
परंतु देवी जगदंबेने त्या राक्षसाचा वध केल्यानंतर लोकांनी जे नृत्य केले त्याला गरबा असे म्हणतात अशी आख्यायिका सांगितली जाते. या अख्यायिकेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचाही उल्लेख आढळतो. म्हणूनच पारंपरिक गरबा नृत्य प्रकारात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासाठी तीन टाळ्या वाजवल्या जातात. म्हणूनच नवरात्रीत गरबा खेळला जातो असं म्हटलं जातं.