देशातील आर्थिक क्षेत्रात डिजिटल व्यवस्था अंगीकरण्यात भारत जगासमवेत पावलावर पाऊल टाकत वाटचाल करत आहे. यांनुसार रुपे क्रेडिट कार्ड लाँच करण्यात आले असून यानुसार मास्टरकार्ड आणि व्हिसा कार्डचे वर्चस्व मोडून काढण्यात येत आहे. आता रुपे आधारित क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक करण्याची सुविधा देखील भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रदान केली आहे. रुपे क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक केल्याने क्रेडिट कार्डधारकांना अनेक फायदे मिळतील. त्याचबरोबर व्यावसायिक लोकांना देखील पेमेंट भरण्यात सुलभता येणार आहे. रुपे क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक कसे करायचे आणि ही सुविधा कशी काम करते तसेच या सुविधामार्फत पैसे भरताना काय नियम असतील, हे जाणून घेऊ.
यूआर कोडने बिल भरणा

आतापर्यंत रुपे क्रेडिट कार्डधारक बिल भरणा करण्यासाठी कार्डला पीओएस मशिनशी स्वाइप करत असत. या प्रक्रियेत सर्वात मोठा अडचण म्हणजे अनेक व्यापार्यांकडे पीओएस मशिन असेलच असे नाही. अशावेळी रुपे आधारित क्रेडिट कार्डधारकांना पैसे भरताना अडचणी यायच्या. पण आता रुपे क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक केल्याने कोणताही रुपे क्रेडिट कार्डधारक यूपीआय कोडचा वापर करत विविध ठिकाणी पेमेंटची सुविधा मिळवू शकतो.
रुपे क्रेडिट कार्ड कसे करावे लिंक
आपल्याकडे रुपे आधारित क्रेडिट कार्ड असेल तर या कार्डला यूपीआयशी लिंक करून त्याच्या सुविधेचा लाभ मिळवू शकता. या प्रक्रियेच्या आधारे आपण सहजपणे या सुविधेचा वापर करु शकता. सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये यूपीआय अॅप डाउनलोड करावा. या ्रअॅपवर आपल्या बँकमध्ये नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर टाका आणि ओटीपीच्या माध्यमातून मोबाईल नंबरला व्हेरिफाय करा. याप्रमाणे यूपीआय अॅपवर आपली नोंदणी होईल. त्यानंतर आपले खाते तयार होईल. या अॅपमध्ये दिलेल्या लिंक क्रेडिट कार्ड बटणला लिक करावे लागेल. यानंतर बॅकांची नावे येतील. पैकी क्रेडिट कार्ड दिलेल्या बँकेची निवड करावी. यानंतर क्रेडिट कार्डच्या शेवटचे सहा अंकी आणि कार्डची मुदत असणारा महिना आणि वर्ष याचा उल्लेख करावा. यानंतर संहा अंकी यूपीआय पीन सेट करा. एवढी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण यूपीआयच्या मदतीने यूआर कोड स्कॅन करून रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरू शकता.
कशाची घ्यावी खबरदारी
यूपीआयवर दररोज एक लाख रुपयांपर्यंत बिल भरणा करण्याची मुभा असते. मात्र आपल्या कार्डवर असलेल्या खर्चाच्या मर्यादेचे पालन करायला हवे. मात्र आणखी काही नियम आहेत. रुपे क्रेडिट कार्डधारक या सुविधेचा वापर करून पर्सन टू पर्सन, कार्ड टू कार्ड किंवा रोखीत व्यवहार करू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही. यामाध्यमातून केवळ यूपीआय यूजर्सलाच पैसे पाठवण्याची किंवा मिळवण्याची सुविधा असते. शिवाय रुपे क्रेडिट कार्डधारक हे अन्य बिल भरणा प्लॅटफॉर्मवरूनही व्यवहार करु शकणार नाहीत.
दोन्हीचे पीन वेगळे असावे
या सुविधेचा वापर करणार्यांनी यूपीआयच्या माध्यमातून थेट बिल भरणा आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारा भरणा यासाठी वेगवेगळे पिन सेट करणे गरजेचे आहे. त्यामुळे बँक खात्यावर सायबरचा धोका कमी राहू शकतो. तसेच या सुविधेच्या माध्यमातून यूआर कोड वापरणारा व्यापारी वर्ग, यूपीआयवर सीसीचाचा वापर करणारे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म यांचेच पेमेंट करता येऊ शकते. यात क्रेडिट कार्ड आणि अन्य बिल भरणा करण्यासाठी ऑटो पेची सुविधा असते. आपण विविध प्रकारचे बिल भरण्यासाठी ऑटो पे सुविधा सक्रिय करू शकता.
याकडे लक्ष द्या
रुपे आधारित क्रेडिट कार्डला युपीआयशी लिंक केल्यानंतर बँक आणि यूपीआय प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरला अपडेट ठेवा. अन्यथा बिल भरताना अडचणी येऊ शकतात. त्याचरबरोबर कोणतेही बिल भरण्यापूर्वी यूपीआय अॅपवर आपले बॅलेन्स तपासून पाहा. जेणेकरून एखाद्या कारणांमुळे आपल्या खात्यातून जादा पैसे जात असतील तर त्याचे तात्काळ आकलन होईल. आपण योग्य कार्यवाही करत पैसे परत मिळवू शकता.