Eye Diseases: मराठवाड्याचा काही भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाचा वर्षाव सुरूच आहे. मुंबई उपनगर शहराला तर रेड अलर्ट असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. थोड्याच दिवसात पाऊस विसावा घेईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असताना, थोडासा दिलासा मिळेल अस वाटत असलं तरी साथीचे आजार मात्र आपले डोके वर काढताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये डोळ्यांची साथ फोफावली आहे. कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात सर्वत्र डोळे येण्याची साथ चालू आहे. डोळे येणे आणि पावसाचा काय संबंध हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.
कोणत्या शहरात किती रुग्ण?
महाराष्ट्रात काही जिल्हे सोडले तर ही साथ सर्वत्र पसरत आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात डोळ्यांची साथ सर्वात जास्त वाढली असून तिथे डोळ्यांच्या साथीचे ७ हजार ८७१ रुग्ण संख्या आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यात ६ हजार ६९३ रुग्ण संख्या आहे. तसंच अमरावती जिल्ह्यात २ हजार ६११ रुग्ण संख्या आहेत. त्यांनतर गोंदिया जिल्ह्यात २ हजार ५९१ रुग्ण संख्याची नोंद झालीय. तर धुळे जिल्ह्यात २ हजार २९५ रुग्ण संख्याची नोंद असून जालना जिल्ह्यात १ हजार ५१२ रुग्ण संख्याची नोंद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात १ हजार ४२७ रुग्ण संख्या आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात १ हजार ४२५ रुग्ण संख्या आहेत. नागपूर जिल्ह्यात १ हजार ३२३ रुग्ण संख्या आढळले आहेत. नाशिक शहरात देखील डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे. शहरात दोन दिवसात १५६ रुग्ण संख्याची नोंद झाली आहे. औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये गेल्या आठवड्यापासून हा संसर्ग पसरला आहे.
डोळे येण्याची साथ ही आता मुंबईमध्ये सुद्धा आली असून मागील दोन आठवड्यांपासून अशा स्वरूपाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. पालिकेच्या मुरली देवरा नेत्र रुग्णालयामध्ये गेल्या १५ दिवसांत २५० ते ३०० नेत्रसंसर्गबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. अशी लक्षणे दिसताच योग्य ती खबरदारी घ्यावी व त्रास जाणवल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांकडून औषधोपचार करून घ्यावेत, असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
सर्वात जास्त त्रास कोणत्या वयोगटाला?
झपाट्याने वाढत असणाऱ्या डोळ्यांच्या आजारांचे टार्गेट सर्वात जास्त लहान मुलं होत आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण याावर्षी डोळे येण्याची साथ सौम्य स्वरुपाची दिसत असली तरी संसर्ग मात्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. गरज असल्यास डॉक्टरांकडे जा, असा सल्ला देखील ज्येष्ठ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरू झाली असून अनेक शाळांमधील मुलांना याची बाधा झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची हजेरी पटाची संख्या रोडावल्याचे चित्र दिसत आहे.
डोळे येणे म्हणजे काय? (Eye Diseases)
हा एक संसर्गजन्य आजार आहे. अॅलर्जीमुळे देखील डोळे येण्याचा धोका संभावतो. बॅक्टेरियल किंवा व्हायरसमुळे डोळे आले असल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. तर अॅलर्जीमुळे डोळे आलेले असल्यास त्याचा दुसऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका नसतो.
डोळे येण्याची साथ का पसरते?
पावसाळ्यात आर्द्रता जास्त प्रमाणात वाढलेली असते. यामुळे व्हायरसला पसरण्यास जास्त वाव मिळतो. वातावरणातील ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात टिकाव धरून राहतो, वारंवार घाम पुसताना त्या हातांचा डोळ्यांना स्पर्श होतो. डोळे येण्याची ही प्राथमिक कारणे आहेत.
डोळे येण्याची लक्षणे कोणती?
1) डोळे लाल होणे आणि पिवळसर द्रव डोळ्यातून येणे
2) डोळ्यातून सतत पाणी येत राहणे
3) डोळे सतत चोळावेसे वाटणे
4) दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे
5) डोळ्यांना सतत खाज येणे
6) पापण्या एकमेकांना चिकटणे
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?
1)डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुत राहावे.
2)नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे.
3)डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करा.
4)उन्हात काळ्या रंगाच्या चष्म्यांचा वापर करावा.
संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी
1)संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टॉवेल वापरणं टाळावं.
2)हात स्वच्छ धुवावेत.
3)डोळ्यांना सारखा हात लावू नये.
डोळ्यांच्या साथीबद्दल तज्ज्ञांचे मत
डॉ. संजय पाटील ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ यांच्या मते, “काही मोजक्या केसेसमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता असते आणि तो संसर्ग बुबुळांमध्ये जाऊ शकतो. तेव्हा बुबुळांवर पांढरे ठिपके दिसू लागतात. आजाराचा गंभीरपणा वाढतो. अशात योग्य औषधोपचारांनी बुबुळातील संसर्गही दूर होतो. पण त्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे डोळे येण्याची लक्षणं जाणवायला सुरुवात होताच योग्य औषधोपचार आणि काळजी घेणं गरजेचं आहे.”
आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी डोळ्यांच्या साथीवर नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं की, “डोळे येणे आजार हा औषधांशिवाय देखील बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांना घाबरून जाण्याची गरज नाही. दिवसातून पाच वेळा हात स्वच्छ धुवा, डोळे पाण्यानं स्वच्छ करा. मेडिकलमधून स्टेरॉईड घेऊन डोळ्यांमध्ये टाकलं तर धोका संभवू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे डोळे आलेल्या रुग्णांपासून अंतर ठेवा.”
तुम्ही हे देखील वाचू शकता-
महात्मा गांधींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास