नागपूर : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार Finance Minister Ajit Pawar यांनी विधानसभेत मांडलेल्या सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49- चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023 Chit Fund Bill मंजूर करण्यात आले. राज्य शासनाकडील अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान केल्यामुळे अपील निकाली काढण्यातील विलंब टाळला जाणार आहे. त्यामुळे अपीलकर्त्यांचा वेळ देखील वाचणार आहे.
विधेयक मांडताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, चिटफंड अधिनियम, 1982 च्या माध्यमातून शासनामार्फत सर्व चिटफंडांचे नियमन केले जाते. या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक मांडले आहे. सध्या वित्त मंत्र्यांकडे अपिलाचे अधिकार आहेत. वित्तमंत्र्यांकडील कामाच्या व्यापामुळे त्यांना अपिलांचे कामकाज चालविण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अपिलाचे अधिकार राज्य कर उपायुक्त दर्जाचा अधिकारी असलेल्या सहनिबंधक या अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, चिटफंड चालवताना काही वेळा वाद निर्माण होतात. त्यावेळी चिटफंड चालवणाऱ्या कंपन्या कलम 69 नुसार राज्य कर विभागातील चिटस् सहनिबंधकांकडे दाद मागतात. चिटस् सहनिबंधकांच्या निर्णयाने जर समाधान झाले नाही तर कलम 70 नुसार त्यांच्या निर्णयाविरुद्ध दोन महिन्यांच्या मुदतीत वित्त मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. या सुधारणेमुळे हे अधिकार खालच्या स्तरावर म्हणजेच सहनिबंधकांकडे राहणार असून त्यामुळे अपील निकाली काढण्याची प्रक्रिया वेगाने पार पडण्यास मदत होणार आहे.
चिट फंड म्हणजे काय ? What is chit fund?
नेमकी हि चिटफ़ंड योजना काय आहे हे जाणून घेऊयात. चिट म्हणजे चिट, चिटफंड, चिठ्ठी, कुरी किंवा इतर कोणत्याही नावाने केले जाणारे व्यवहार. याचा वापर बचत योजना म्हणूनही केला जातो. बऱ्याचवेळा आपली गरज भागवण्यासाठी अशा चिट फंडचा वापर केला जातो. चिट फंडच्या कायद्यानुसार चिट फंड कंपन्यांचे रजिस्ट्रेशन आणि नियमन हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. कायद्यातील कलम 61 अनुसार चिट रजिस्ट्रारची नियुक्ती सरकारद्वारे केली जाते.
चिट फंडमध्ये प्रामुख्याने बऱ्याचदा आपल्या परिचयातील, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये एका नियमाला धरून पैशांची देवाण-घेवाण केली जाते. या नियमानुसार, एक ठराविक रक्कम लोकांकडून जमा केली जाते आणि त्याची दिलेली मुदत संपली की, ती जमा केलेली रक्कम ठरलेल्या व्याजासह लोकांना परत केली जाते.
चिट फंडमध्ये फसवणूक कोठे होते ? Where is the fraud in chit funds?
चिट फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांची ठराविक रक्कम दुप्पट करून दिली जाते. पण जेव्हा गुंतवणुकीचे आकारमान वाढते तेव्हा चिट फंडमधील कंपन्यांना पैसे दुप्पट करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू लागते. त्यात नवीन गुंतवणूकदार येत नसतील तर लोकांचे पैसे देणे अवघड जाते. तेव्हा बहुतांश चिट फंड कंपन्या बंद पडतात. जोपर्यंत नवीन गुंतवणूकदार येत असतात, तोपर्यंत ही स्कीम व्यवस्थित चालत राहते. अन्यथा नुकसान होते.