Mental Health : आयुष्यात बराच वेळा असा काळ देखील येतो जेव्हा जगण्यामध्ये स्वारस्य देखील वाटत नाही. अर्थात आपण आपल्या आयुष्यात नेमकं काय करतोय ? जे करतोय त्यात देखील रस वाटत नाही. कोणतेही काम करावे वाटत नाही किंवा कोणाशी बोलण्याची देखील इच्छा होत नाही. असं का होतं तर साधी सोपी गोष्ट आहे. आयुष्यातल्या रोज त्याच त्याच गोष्टी याला कारणीभूत असू शकतात नेमक्या कोणत्या गोष्टी तुमची मनस्थिती खराब करू शकतात हे पहिले पाहुयात
- रोज एकसारखेच काम करणे किंवा करावे लागणे
- न आवडणाऱ्या किंवा सातत्याने स्वभाव न पटणाऱ्या व्यक्तीसोबत वादविवाद होत राहणे किंवा आपण त्याला कौटुंबिक कलह म्हणू शकतो.
- कोणत्यातरी मोठ्या गोष्टीचे टेन्शन असणे जसे की कर्ज, मुला-मुलींची लग्न न होणे, मूलबाळ न होणे, प्रसूतीनंतरचे नैराश्य…
अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे आपण सातत्याने फक्त त्रासाचा किंवा टेन्शनचा विचार करत असतो. त्यामुळे अशी मनस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी आज तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही या नैराश्यातून तात्पुरते का होईना नक्की बाहेर पडू शकाल.
- तर सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवा जशी वाईट वेळ आली आहे तशीच चांगली वेळ देखील येणारच आहे.
- दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक घटनेसाठी एक वेळ यावी लागते ती येईपर्यंत वाट पाहावीच लागेल त्यामुळे निरर्थक विचार करूच नका. अर्थात विचार करू नका असं म्हटल्याने मनात विचार येत नाहीत असं होणार नाही. पण कमीत कमी हे विचार टोकाकडे जातील असे होऊ देऊ नका. मार्ग नक्की निघत असतो ती वेळ येऊ द्या…
- लक्षात ठेवा प्रत्येक वेळी तुमच्या टेन्शन बाबत चार लोकांशी बोलल्याने त्यातून मार्ग निघेल किंवा तुम्हाला मोकळं वाटेल असं होत नसतं. तुमच्या संकटाला तुम्हालाच सामोरे जायचं आहे ! आणि तुम्हाला कोणाचीही मदत मिळणार नाही ! हे आधी मनाला सांगा आणि मग ते संकट कस थोपवायचं आहे याचा मार्ग शोधा
काही किरकोळ बदल आहेत जे केल्याने तुम्हाला हलकाफुलका मानसिक आराम मिळेल. तर काय करायचं आहे की एक दिवस तुम्हाला घरातल्या रूममध्ये एकट बसायचं आहे. मोबाईल जवळ घेऊ नका. त्यादिवशी तुम्हाला फक्त स्वतःशी बोलायचं आहे. आत्मपरीक्षण करायचा आहे . यावेळी तुम्ही केलेल्या चुका चांगले घेतलेले निर्णय यातून आलेले अनुभव हे आठवा… महत्त्वाचं म्हणजे जो काही त्रास किंवा जे टेन्शन तुम्हाला आहे त्याचा यावेळी विचार करू नका.
या दिवशी स्वतःला वेळ द्या. तुम्ही लहानपणी कोणते खेळ खेळायचात ? तुमचे छंद काय होते ? जुन्या लहानपणीच्या चांगल्या आठवणी.. जमलं तर घरातल्या तुमच्या जुन्या वही, पुस्तकं, खेळण्या या वस्तू उचकून बघा ! तुमचा जुना छंद असेल तो पुन्हा ट्राय करायला हरकत नाही. हा दिवस सगळं विसरून फक्त स्वतःच्या आनंदासाठी जगा. जमलं तर भरपूर रडून घ्या पण एकांतातच… !
बऱ्याच जणांना असा एकांतातला दिवस जगणं शक्य नाही होणार. असं असलं तरीही एखादा तास का होईना तुम्ही स्वतःला देऊ शकता. यातून आपल्याला एवढंच साध्य करायच आहे की दुसरं कोणीतरी येऊन केलेलं सांत्वन तुम्हाला जेवढी उभारी देऊ शकणार नाही, तेवढा तुमचा स्वतःचा आत्मविश्वास देणार आहे. तोच या एका दिवसात तुम्हाला परत मिळेल हे नक्की. स्वतःला फक्त एवढंच म्हणा ‘मी ही माणूस आहे. वेळ लागेल पण नक्की जमेल !’
आता काही किरकोळ बदल करा, अगदी फोनची रिंगटोन बदलणे, सोशल मीडियावरचे तुमचे डीपी बदलणे, हेअर कट ट्राय करायला सुद्धा हरकत नाही. सलोन मध्ये जाऊन तुम्ही स्वतःला पेंपर करू शकता. तुमच्या लुक मधला बदल सुद्धा तुम्हाला चांगली प्रेरणा देईल, करून तर पहा.
काही मोटिवेशनल चित्रपट पाहू शकता. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं फूड ट्राय करा.
जुन्या मित्रांना भेटायला जाऊ शकता.
खिशाला परवडेल अशी लहान-मोठी ट्रीप देखील काढू शकता. नाहीच जमलं तर गाडी काढा आणि एकटच बाहेर चक्कर मारून या. एखाद्या वाईट मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही घरा बाहेर पडा.
सकाळी फिरायला जाणे किंवा अगदी संध्याकाळी जरी जमलं तरी पायी मोकळ्या हवेत फिरायला जा. तुम्ही आस्तिक असाल तर एखाद्या शांत ठिकाणी असलेल्या मंदिरात जाऊन बसलात तरीही मनाला खूप बळकटी मिळेल.
एकंदरीतच तुम्ही जिवंत आहात म्हणूनच समोर संकट येत आहेत. आणि यालाच आयुष्य म्हणतात. त्यामुळे माझ्याच समोर अशी संकट का येतात ? हा विचार करण्यातच अर्थ नाही. आयुष्य रोजच सुंदर असेल असे नाही पण ते सकारात्मक असावे यासाठी आणि तुम्ही आनंदात असावे यासाठी तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करायचे असतात. दुसरं कोणी तुम्हाला आनंदात ठेवेल किंवा ठेवायला हवं अशी अपेक्षा करणे बंद करा !
आजचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.