Mumbai Terrorists Attack: देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर २००८ ला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला काल पंधरा वर्ष पूर्ण झाली. मात्र, आजही या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा उल्लेख केला तरी मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांना ( Mumbai Police) शहरात दहशतवादी घुसल्याचा काल फोन आला आणि सर्वत्र खळबळ माजली. मुंबईत दहशतवादी घुसले असून ते हल्ले करणार असल्याचे फोनद्वारे पोलिसांना माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता सत्य समोर आले. (Mumbai Terrorists Attack terrorists entered mumbai police control)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना मिळालेली माहिती चुकीची असल्याचे चौकशीत समजले. याप्रकरणी लक्ष्मण ननावरे या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम १८२ आणि ५०५ (१) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने काल मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे शहरात दहशतवादी घुसल्याची चुकीची माहिती दिली. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता, असेही समजत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मुंबईत दहशतवादी घुसल्याचा फोन येताच पोलिसांनी वेळ न घालवता पुढील तपासाला सुरुवात केली. कारण, २६/११ च्या हल्ल्यात पोलीस आणि मुंबईकरांनी जे पाहिले आहे, हे कधीच ते विसरु शकणार नाहीत. या हल्ल्यात तब्बल १६६ जणांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरात मुंबई पोलिसांनीही १० पैकी ९ दहशत वाद्यांच्या खात्मा केला. मुंबई पोलीस दलातील हवालदार शहीद तुकाराम ओंबळे यांनी छातीवर गोळ्या झेलून अजमल कसाबला जिवंत पकडले. मात्र, काही दिवसानंतर त्यालाही फासावर चढवण्यात आले.
यापू्र्वीही २१ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री उशीरा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला असाच एक फोन आला होता. ज्यात एका व्यक्तीने मुंबईत मोठा स्फोट घडवला जाणार असल्याची माहिती दिली. मात्र, चौकशीत ही माहिती खोटी असल्याचे समजले.