वाघ बकरी हा प्रसिद्ध चहा ब्रँड असलेल्या गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे रविवारी २२ ऑक्टोबर ला निधन झालं.अहमदाबाद मधील एका खासगी रुग्णालयात वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.तर त्यांच्या निधनानंतर आता समाजमाध्यमात वाघ बकरी या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.कारण असे अनोखे नाव असलेल्या या चहाची सुरुवात नेमकी कुणी केली होती व कधी आणि कुठे झाली होती ?आणि विशेष म्हणजे वाघ बकरी या नावा मागचा अर्थ नेमका काय आहे?असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आणि वाघ बकरी या लोकप्रीय ब्रँडचां रंजक इतिहास नेमका काय आहे जाणून घेऊ…
खरतर चहाचे,वाघ बकरी हे नाव आजही अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे.तर ‘वाघ बकरी’ च्या लोगोत एका व्यक्तीच्या हातात चहाचा कप आहे आणि एका मोठ्या पेल्यात वाघ आणि बकरी चहा पिताना दाखवण्यात आलेत.कंपनीच्या म्हणण्यानुसार हा लोगो लोकांमधला भेदभाव कमी करणारा आहे व याचे विश्लेषण देताना कंपनीने असे सांगितले आहे की लोगोतला वाघ हा उच्च वर्गाचं प्रतिनिधित्व करतो तर बकरी ही सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करते कारण चहा हे एक असं पेय आहे,जे श्रीमंत आणि गरिबातला फरक मिटवतो.त्यामुळे हा लोगो नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.खरतर या चहाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती.साल १८९२ मध्ये गुजरातमधील नारनदास देसाई या व्यक्तीने दक्षिण आफ्रिकेत ५०० एकरवर चहाचे मळे लावले होते.
आणि त्याच वेळी महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत इंग्रजाकडून होणाऱ्या वर्णभेदा विरूद्ध लढा उभारला होता. त्यामुळे नारनदास देसाई हे महात्मा गांधींचा फार आदर करायचे आणि त्यांना गुरुस्थानी मानायचे.पुढे साल १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि नारनदास यांनी सुध्दा मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.आणि पुन्हा चहाच्या व्यवसायात उतरायचं ठरवलं व स्वतःला असणाऱ्या चहा व्यवसायाच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी १९१९ साली अहमदाबादमध्ये गुजरात टी डेपोची स्थापना केली.आणि पुढील काही वर्षांतच ते गुजरातमधील सर्वात मोठे चहा उत्पादक बनले.पुढे साल १९३४ मध्ये ‘गुजरात टी डेपो’ने लोगोसह ‘वाघ बकरी चहा’ हा ब्रँड सुरू केला.त्यानंतर काही वर्षांनी नारानदास देसाई यांचे पुत्र रसेश देसाई यांनी कंपनीचा कारभार पाहायला सुरुवात केली. आणि साल १९८० पर्यंत त्यांनी गुजरात चहा डेपोचे ७ रिटेल आऊटलेट सुरू करून चहाची घाऊक आणि किरकोळ विक्री सुरू ठेवली.व त्याच वर्षी या समूहाने गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडची स्थापना केली आणि पाकिटबंद चहाची विक्री करायला सुरू केली आणि अशाप्रकारे पाकीटबंद चहा विक्री करणारा वाघ बकरी हा ब्रँड देशातील पहिला चहा ठरला.
पुढे रसेश यांचे पुत्र पराग देसाई हे १९९५ मध्ये या कंपनीत रुजू झाले आणि १९३४ मध्ये सुरू झालेल्या वाघ बकरी या चहाला त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या पहिल्या तीन चहा कंपन्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.खरतर पराग देसाई ज्यावेळी कंपनीत रुजू झाले होतेत्यावेळी कंपनीची उलाढाल सुमारे १०० कोटी रुपये इतकी होती.पण अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील लाँग आयलँड विद्यापीठातून एमबीए केलेल्या पराग देसाई यांनी चहाची विक्री,विपणन आणि निर्यात या सर्व गोष्टीत लक्ष घालून साल १९९८ मध्ये वाघ बकरी या चहा ब्रँडच सिमोलंघन केलं आणि राजस्थानमध्ये विक्री सुरु झाली.पुढे २००७ ते २००९ या दोन वर्षात महाराष्ट्र,दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कंपनीनं विस्तार केला.तर आज कंपनीचा व्यवसाय सुमारे २ हजार कोटी रुपयांचा आहे.व देशातील २४ राज्ये आणि जगातील ६० देशांमध्ये पसरलेला आहे.
इतकच नाही तर बदलत्या युगाचा कल लक्षात घेत कॉफीची मक्तेदारी असणार्या कॅफे क्षेत्रातही वाघबकरीनं पाऊल टाकत २०१४ मध्ये कंपनीने ‘वाघ बकरी टी लाउंज’ सुरू करत ‘कॅफे मार्केट’मध्ये पदार्पण केलं.व टी लाऊंजची साखळी निर्माण केली.आज अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, पुणे आणि गोव्यात वाघ बकरी टी लाउंज यशस्वी बिझनेस करत आहेत.तर या वाघ बकरी टी लाऊंजमध्ये मसाला चहा सोबत खाकरा दिला जातो ही विशेष बाब आहे.तसेच गेल्या अनेक वर्षांमध्ये चहाचे विविध फ्लेव्हर्स मार्केट मध्ये आले आहेत.तरुणांसाठी Ice tea तर फिटनेस फ्रीक्ससाठी Green tea असे फ्लेव्हर्स बाजारात उपलब्ध झाले आणि ग्राहकांची हीच गरज लक्षात घेत वाघ बकरी चहाने सुध्दा एक पाऊल पुढे टाकत Ice tea ,Green tea, Lemon tea, Ginger tea सारखे अनेक फ्लेव्हर्स बाजारात आणले आहेत.तर मार्केटिंग जगतातलं सर्वात मोठं नाव असलेल्या फिलिप कोटलर यांनी सुध्दा ‘वाघ बकरी’ चा लोगो आणि त्याच्या रंजक कहाणीला आपल्या पुस्तकात जागा दिली आहे. व हा लोगो खूप अनोखा असल्यांच त्यांनी नमुद केलं आहे.