अवघ्या 20 रुपयांमध्ये मिळणाऱ्या रेशन कार्डसाठी नागरिकांना चिरीमिरी द्यावी लागत आहे. त्यावर पर्याय म्हणून सरकारकडून ऑनलाईन रेशनकार्ड मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरीही ‘ई-सुविधा केंद्र’ वा एजंट लोकांकडून यासाठी तब्बल 1 ते 2 हजार रुपये आकारले जात आहेत. गेल्या चार महिन्यांचा विचार केला तर शहरातील जवळपास साडेसात हजार नागरिकांनी ‘ई-रेशनकार्ड’ काढले आहे.
रहिवासी पुरावा, आधार, पॅनकार्ड काढण्यासाठी अथवा बँकेत पुरावा म्हणून रेशनकार्ड ग्राह्य धरले जाते. पूर्वी उफ्लाईं रेशनकार्ड तयार करावे लागत असल्याने यात चिरीमिरी घेण्याचे प्रकार वाढले होते. ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. एजंट आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतेही काम पुढे जात नव्हते.
यालाच पर्याय म्हणून आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने 17 मे पासून ‘ई-रेशनकार्डची’ सुविधा सुरू केली होती. त्याद्वारे एका क्लिकवर रेशनकार्ड उपलब्ध होईल अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र येथेही आता नागरिकांची लूट सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.आणि यासंदर्भांत निरीक्षण पुरवठा विभागाने देखील नागरिकांची लूट होत असल्याचं निरीक्षण नोंदवलंय.