महाराष्ट्र : यंदाची लोकसभा निवडणूक ही राजकारण्यांच्या आरोप प्रत्यारोप, पक्षातील फोडाफोडी-वादावादी आणि मतदारांच्या ठाम भूमिकेमुळे प्रचंड गाजली आहे. अनपेक्षित आणि धक्कादायक असे निकाल पचवणं भाजपला कठीण जाते आहे. यामध्ये सर्वात जास्त तापदायक परिस्थिती निर्माण झाली आहे ती अजित पवार Ajit Pawar यांच्यासाठी…
अजित पवारांनी काका शरद पवार यांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत अनेक जण देखील बाहेर पडले. पण अजित पवारांना या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच जागांपैकी केवळ एक जागा मिळवण्यात यश प्राप्त झाले आहे. तर दुसरीकडे शरद पवारांना दहा पैकी आठ जागांचे घावाघवीत यश मिळाले आहे.
या निवडणुका पार पडताना अजित पवारांनी प्रत्येक जाहीर सभांमध्ये अत्यंत रोखठोक आणि सडेतोड शैलीमध्ये भाषणं केली. यावेळी अहमदनगर शिरूर आणि बीडच्या विरोधी उमेदवारांना त्यांनी थेट निवडून कसा येतो तेच बघतो अशा भाषेत आव्हान दिलं होतं. आणि नेमके हे तिघेजणच मोठ्या फरकानं निवडून आले आहेत. त्यामुळे निकाल लागून आता एक दिवस उलटला असला तरी अजित पवारांनी मात्र कोणतेही वक्तव्य आतापर्यंत माध्यमांसमोर केलेले नाही.
कोण आहेत हे तीन उमेदवार
शिरूर – खासदार डॉ. अमोल कोल्हे
शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आढळराव पाटील यांच्या विरोधात अमोल कोल्हे यांचे आव्हान होतं. यावेळी त्यांनी, ” तुझा बंदोबस्तच करतो, कसा निवडून येतो तेच बघतो..!” असं थेट आव्हान अमोल कोल्हे यांना दिलं होतं. तर अमोल कोल्हे हे शिरूर मधून पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
अहमदनगर – खासदार निलेश लंके
अहमदनगरमध्ये महायुतीचे भाजप पुरस्कृत उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचार सभेमध्ये विरोधी उमेदवार निलेश लंके यांना अजित पवार म्हणाले होते की, ” तू खासदार कसा होतो तेच बघतो. तुझी जिरवतो ! ” अशा शब्दात त्यांनी निलेश लंकेंवर टीका केली होती. यावेळी निलेश लंके देखील जायंट किलर सिद्ध होऊन अहमदनगरचे खासदार बनले आहेत.
बीड – खासदार बजरंग सोनावणे
बीडमध्ये देखील महायुतीच्या भाजप पुरस्कृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी अजित पवार उपस्थित होते. यावेळी बजरंग सोनावणेंना उद्देशून ते म्हणाले होते की, ” दोन पैसे आले की मस्ती आली का ? आता बघूनच घेतो..! ” तर बीडमध्ये बजरंग सोनवणे हे देखील निवडून आले आहेत.