सातारा : महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अशातच त्यांच्या वंशजांबाबत केलं जाणार अपमानजनक वक्तव्य यामुळे महाराष्ट्रात मोठ्या वादाची ठिणगी पडली आहे. भाजप उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींचा केलेला अपमान यामुळे आता कोल्हापूर आणि साताऱ्यातून मोठे पडसाद पडायला सुरुवात झाली आहे.
शाहू छत्रपतींना थेट तुम्ही खरे वारसदार आहात का ? अशा शब्दात अपमानित करण्यात आलं. हा अपमान केवळ शाहू छत्रपतींचा नाही तर महाराष्ट्राचा असल्याची भावना आता मराठी माणसांमध्ये आहे. कशातच आता अभिनेते किरण माने यांनी देखील एक जळजळीत पोस्ट करून थेट छत्रपती उदयनराजे यांना देखील आव्हानच दिला आहे. छत्रपती उदयनराजे जर भाजपकडून साताऱ्यात निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांना मत देणार नाही अशी रोखठोक भूमिका किरण माने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली.
Kiran Mane – कोल्हापूर असो वा सातारा… छत्रपतींची गादी हा… | Facebook
किरण माने यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे कि, कोल्हापूर असो वा सातारा… छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय. गादीला मत दिलं-नाही दिलं तरी, अपमानकारक विधानं करून कधीच कुणी महामानवांशी प्रतारणा नाही केली. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेनं त्यांचा पराभव केला. पण त्यावेळीही त्या गादीचा अवमान होईल असा एकही शब्द कुणी बोललं नव्हतं. आज मी स्पष्ट शब्दांत सांगू शकतो की छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. व्यक्ती वेगळी-महामानवांची गादी वेगळी.
परवा कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना घसरून सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट अपमान केला गेला !
ही खुप खुप खुप घृणास्पद गोष्ट आहे. याहून मोठा कृतघ्नपणा असूच शकत नाही.
मनूवाद्यांची घरातली कुजबूज स्वरूपातली भाषा आज लाचार बहुजनांकडून वदवून घेतली जात आहे, हे लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडून वर्चस्ववादी सत्ताधार्यांच्या वळचणीला गेलेला प्रत्येक नेता जे बोलतोय… ते त्याचे स्वत:चे मत नाही. त्याच्या नाजूक जागा पकडीत चेंबटून त्याच्याकडून ते बोलून घेतलं जातंय. वयाची साठ-पासष्ठ वर्ष ज्या चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली… ज्या चुलत्यानं मुलगा मानून मतदारसंघ आणि मोठमोठ्या पदांचा धनी बनवलं… त्या चुलत्याला मी एकवेळ विरोध करेन, पण वावगं बोलायची आपली कुणाची जीभ रेटेल का??? समजा, मी रिक्षावाला होतो. ज्या घरानं, कुटूंबानं मला नांव, पैसा, मानसन्मान दिले… त्या घराच्या मी एकवेळ विरोधात जाईन, पण त्या घराविषयी मी चुकीचा एक तरी शब्द काढेन का???
यांचे ‘बोलविते धनी’ वेगळे आहेत. मतदारांनो ते ओळखा. आपल्या महामानवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातलंय. मनूवाद्यांची सगळी कटकारस्थानं, खोट्या बदनामीचे घाव झेललेत. त्यांच्याशी गद्दारी करू नका.
कोल्हापूरचे शाहू छत्रपती भाजपाकडून उभे राहिले असते तर आम्हीही त्यांना विरोध केला असता, पण या पातळीवर नक्कीच उतरलो नसतो. पण आपल्या सुदैवाने हे शाहू त्या समतेच्या विचारधारेची नाळ जपणारे आहेत. वर्चस्ववाद्यांना ठेचायला मैदानात उतरले आहेत. त्यांचे हात बळकट करून मातीशी इमान राखणं हे प्रत्येक कोल्हापूरकराचे कर्तव्य आहे.
जय शिवराय… जय भीम ! किरण माने