Panshet Dam Burst : महाराष्ट्रातील महत्वाचं शहर असलेलं पुणे आज भरभराटीला आलेलं दिसतं. मात्र ६२ वर्षांपूर्वी याच शहराने आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात पाहिला होता. आजच्याच दिवशी म्हणजे १२ जुलै ला १९६१ मध्ये पुणे एका भीषण संकटाला समोर गेलं होतं. पुणेकरांसाठी हा काळा दिवस होता. याच दिवशी पुण्याची पाण्याची तहान मिटवणारं पानशेत धरण फुटून पुण्यात प्रलय निर्माण झाला होता.
६२ वर्षांपूर्वी पुण्यात काय झालं होत? (What happened after Panshet dam burst in Pune)
१२ जुलै १९६१ ला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटलं होतं. या घटनेत एक हजारहून अधिक लोक मुत्यूमुखी पडले होते. पानशेत धरण फुटून झालेल्या प्रलयात जवळपास १ लाख लोक विस्थापित झाले होते.
पुण्याला लागणाऱ्या पाण्याची गरज पाहता पानशेत धरणाची निर्मिती त्याकाळी सुरु होती. खरंतर धरण १९६२ मध्ये पूर्ण होणार होतं. पूर्णपणे मातीपासून हे धरण बनवण्यात येत होतं. मात्र प्रचंड पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात आलं आणि धरण फुटलं. पानशेत धरण फुटून पाणी वाहत वाहत खडकवासलाकडे धरणाकडे आलं. खडकवासला हे छोटं दगडी धरण होतं. पाणी खडकवासला पार करत पुणे शहरात शिरलं. सकाळी १० वाजेपर्यंत पुण्यात सर्वत्र पाणी शिरलं होतं.
कसबा पेठ, सोमवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ ही पुण्यातील महत्वाची ठिकाणं पूर्ण पाण्यात गेली होती. चार-चार, पाच-पाच मजली इमारती देखील पाण्याखाली गेल्या होत्या. बघता बघता इमारती कोसळू लागल्या होत्या. अनेक घरं पुराच्या पाण्यात बुडाली होती. अनेकांच्या घरातील सामान वाहून गेले होते. अंगावरचे कपडे घेऊन लोकं घर सोडून बाहेर पडले होते.
पुण्यातील बंड गार्डन पूल सोडला इतर सगळे पूल पाण्याखाली गेले होते. लोकं स्वतःचा जीव वाचवत मिळेल त्या रस्त्याने सुरक्षित ठिकाणी पळत होते. डेक्कन कॉलेजच्या मागच्या टेकड्या त्या दिवशी माणसांनी भरल्या होत्या. ‘160, नारायण पेठ’ ही ४ मजली इमारत त्या दिवशी तिसऱ्या मजल्यापर्यंत पाण्यात बुडाली होती. आजही या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पाणी कुठपर्यंत पोचलं होतं याची खुण केलेली दिसते.
पानशेत धरण कधी बांधण्यात आले होते?
पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९५० ला खडकवासला धरण बांधण्यात आलं होत. दिवसेंदिवस पुणे शहराची लोकसंख्या वाढू लागल्याने, शहराची पाण्याची गरज देखील वाढू लागली होती. वाढलेली पाण्याची तहान मिटविण्यासाठी खडकवासलाच्या पश्चिमेला अंबा नदीवर १० ऑक्टोबर १९५७ ला पानशेत धरण बांधायला सुरुवात झाली होती आणि १९६२ पर्यंत हे धरण बांधून पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र त्यापूर्वीच धरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु होतं. नाशिकच धरण सोडलं, तर इतर कोणतंच धरण त्याकताळी मातीचा नव्हतं त्यामुळे हे धरण बांधायला अनुभव कमी पडला, असं देखील बोललं जातं.
पानशेत धरण कसा फुटला? (Why did Panshet Dam burst)
पानशेत धरण पूर्णपणे मातीपासून बनवण्यात येत होतं. दरम्यान जून १९६१ मध्ये पुण्यात सलग १० दिवस पाऊस चालू होता. सलग पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत चालली होती. धरणाचं बांधकाम कच्चं होतं. तसेच जोरदार वारा सुटल्याने पाण्याच्या लाटा यायच्या. परिणामी धरणाच्या बांधकामामधून पाणी झिरपू लागलं होतं. ११ जुलै १९६१ ला रात्री पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती. ही भेग झाकण्यासाठी आणि रात्रीच फुटणाऱ्या धरणाला सकाळपर्यंत थांबवून ठेवण्यासाठी जवानांनी रात्रभर पानशेतच्या भेगांसमोर रेतीच्या अनेक ट्रक तसेच रेती आणि सिमेंटचे पोते धरणात उलटवल्या. मात्र जे व्हायचं होत ते झालंच, सकाळी पानशेत धरण शेवटी फुटलंच.