मुंबई : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर थेट शब्दात टीका केलेले ट्विट आज राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरते आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये सभेमध्ये बोलताना भाजपवर कडाडून टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी आज एक ट्विट केले आहे.
ट्विटमध्ये नेमकं काय
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेतील भाजप विरोधी वक्तव्यावरून आज एक थेट शब्दात कान उघडणे करणारे ट्विट केले आहे. यावेळी बावनकुळे यांनी लिहिले आहे की,
उद्धवजी ,
” शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणाले. पण वेळ येताच दगाबाजी करून अविचारी आघाडीच्या मांडीवर बसत मुख्यमंत्रीपद स्वतःच पटकावलं. हा सामान्य शिवसैनिकांशी विश्वासघात नाही का? ज्यांनी तुम्हाला भावासारखं प्रेम दिलं. त्यांचे तुम्ही फोन घेतले नाहीत. अबोला धरला. दगाबाजी केली. तुम्ही बारामती आणि दिल्लीसमोर कुर्निंसात करत होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची कशाला खोटी शपथ घेता? तुम्हीच दगाबाजी केली! होय, तुम्हीच!!
निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभा आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित भाई घेत होते, तेव्हाच हा खुलासा का केला नाही? कारण, काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी तुमच्या गोपनीय चर्चा सुरु होत्या. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून होतो आणि आता कुलस्वामिनीसमोर शपथ घेता? आता तुमचे पद गेले, पक्ष गेला, निशाणी गेली, विश्वासू माणसेही गेली. हिंदुत्व नासवले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावर मूग गिळून बसले, सनातन धर्मावर मिंधे झाले. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेत राजकारण आणलं. हाती धुपाटणं आले म्हणून पुन्हा ‘बंद खोलीतील’ रडगाणं सुरु झालं. तुम्ही आमचा विश्वासघात केला, आता किमान देवी देवतांचा विश्वासघात करू नका. “
उद्धव ठाकरेंनी नेमकी काय केली होती टीका
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना थेट भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, ” 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मला शब्द दिला होता. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्मुला देखील ठरला होता. पण आता ते खोटं बोलत आहेत. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की अमित शहा खोटं बोलत आहेत.” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरूनच आज आता बावनकुळे यांनी हे ट्विट केले असून राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.