Pune Murder Case : दर्शना पवार मर्डर केस ताजे असतानाच पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. एका तरुणाने रस्त्याच्या मधोमध एका तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. प्रवाशांनी हल्लेखोराचा मुकाबला करून मुलीचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यात पुणेकरांचे कौतुक होत आहे.
पुणे : महाराष्ट्रातील पुणे शहरात एका १९ वर्षीय तरूणीवर तिच्या मित्राने भरदिवसा हल्ला केला. मात्र, रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तत्परता दाखवून मुलीचे प्राण वाचवले. या भीषण घटनेचा व्हिडिओही समोर आलांय. पुण्यातील लोकांनी सक्रियता दाखवून मुलीला हल्लेखोरापासून वाचवले, त्यामुळे पुणेकरांचे कौतुक होत आहे.
धारदार शस्त्राने तरुणीवर हल्ला
सदाशिव पेठेतील पेरुगेट परिसरात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यांनी सांगितले की, आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एका कॉलेजमध्ये शिकत होते आणि मुलीने नुकतेच त्याच्याशी बोलणं बंद केलं होते. पोलिस उपायुक्त (झोन I) संदीप सिंग गिल म्हणाले की, आज सकाळी तरुणी दुसऱ्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना तरुण तिच्याजवळ आला. तरुणाने तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने धारदार शस्त्र काढून तरुणीवर हल्ला केला.
तरुणीच्या मित्रावरही हल्ला करण्यात आला
पीडितेच्या मित्राने हस्तक्षेप करून हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलगी कशीतरी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली. हल्लेखोराने मुलीचा पाठलाग केला पण तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला थांबवले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली असून तिला उपचारानंतर रुग्णालयातून नेण्यात आले आहे.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यात ती तरूणी तिच्या मित्रासोबत दुचाकीवर बसलेली होती. आरोपी रस्त्याने चालत असताना तिच्याशी बोलत असल्याचे दिसत आहे. दुचाकी चालवणारा तरुण आरोपीचा सामना करण्यासाठी वाहनातून खाली उतरतो पण आरोपीने पिशवीतून धारदार शस्त्र काढून तरूणीवर हल्ला केला.
लोकांनी वेळ न गमावता तरूणीचे प्राण वाचवले
या घटनेचे आणखी एक फुटेज देखील समोर आले आहे ज्यात ती तरूणी पळताना दिसत आहे आणि हल्लेखोर तिच्यावर मागून धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, तरूणी खाली पडते आणि तिथून जाणारे लोक हल्लेखोराला थांबवतात. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.