हिंगोली : हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेंद्र जाधव यांनी आई वडील आणि भावाचा अपघात झाल्याचं सांगितलं होतं. परंतु घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि महेंद्र जाधव याच्या चौकशीतून मिळालेली विसंगत उत्तर यामुळे पोलिसांना संशय आला आणि एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे.
दरम्यान महेंद्र जाधव हा गेल्या काही महिन्यांपासून घरीच होता. स्वतः काहीच कमवत नव्हता. यावेळी भाऊ आकाश, वडील कुंडलिक जाधव आणि आई कलावती जाधव हे पैसे देत नाहीत आणि नातेवाईकांमध्ये बदनामी करतात याचा राग मनात धरून त्याने थेट आई-वडिलांच्या आणि भावाच्या हत्येचा कट रचला होता. महेंद्र जाधव यांनी पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले की, हत्येचा कट रचण्यापूर्वी त्याने दृश्यम हा चित्रपट पाच वेळा पाहिला. तसेच क्राइम पेट्रोल देखील पाहिले होते. यातूनच त्याने सुरुवातीला भावाच्या हत्येचा कट रचला.
९ जानेवारीला त्याने आपल्या भावाला झोपेच्या गोळ्या खायला घातल्या. त्यानंतर त्याला शॉक दिला तरीही तो मेला नाही म्हणून त्याच्या डोक्यात धारदार शास्त्राने घाव घालून त्याची हत्या केली आणि गावाजवळील एका नाल्यात फेकून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आईला देखील झोपेच्या गोळ्या खायला घालून शेतात नेऊन तिच्या देखील डोक्यात घाव घातला. तिची हत्या केल्यानंतर तिला देखील भाऊ जिथे मयत पडला होता तिथेच देऊन टाकले. त्यानंतर रात्री वडिलांची देखील अशीच हत्या केली आणि दोघांच्या मृतदेहाजवळ वडिलांचा मृतदेह देखील नेऊन टाकला आणि त्यानंतर अपघात झाल्याचा बनाव रचला होता.
पोलिसांनी कौशल्याने वेळीच महेंद्र जाधव याचा डाव ओळखला आणि योग्य तपास करून आरोपी मुलाला अटक केली आहे.