तुमचे जर देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत म्हणजेच SBI मध्ये खाते असेल आणि तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमचा एकही एमआय चुकणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तुमचा ईएमआय चुकला तर तुम्हाला आठवण करुन देण्यासाठी बँक चॉकलेट पाठवणार आहे. वेळेवर कर्जाचे हप्ते भरावेत यासाठी बँकेने नवीन मोहिम आणली आहे.
एकीकडे बँकिंग क्षेत्रात रिटेल लोनमध्ये तेजी आली असतानाच एसबीआयने ही मोहीम आणली आहे. रिटेल लोनमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतु या वाढीसह मासिक हफ्ता चुकवल्याच्या प्रकरणातही वाढ झाली आहे. अशात सर्व बँका ईएमआय आणि रिपेमेंटसाठी वेगवेगळे उपक्रम सुरु करत आहे. त्यातच एसबीआयची ही चॉकलेट योजना देखील वसुली सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे.
एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांनी सांगितलं की, “बँकेची ही मोहीम अद्याप प्रायोगिक टप्प्यात आहे. एसबीआयने ही योजना 10 ते 15 दिवसांपूर्वीच सुरु केली आहे. सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या मोहिमेमुळे संकलनात सुधारणा होत आहे. प्रायोगिक टप्प्यात चांगले परिणाम मिळाल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करता येईल.”