मीरा बोरवणकर नाम तो सूना होगा.२०१७ साली पोलिस सेवेतून निवृत्त झालेल्या मीरा बोरवणकर या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी ठरल्या होत्या.पोलिस दलात केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख लेडी सुपरकॉप अशी राहिली आहे.खुद्द अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहिण हसीना पारकरला सुध्दा मीरा बोरवणकर या नावाची भिती वाटायची,याच मीरा बोरवणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत आणि याच कारण ठरले आहे त्यांचे ‘मॅडम कमिशनर’हे आगामी आत्मचरित्र या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या एका प्रसंगामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे पुणे पोलिस आयुक्तपदी असताना सरकारी जमीनीच्या लिलाव प्रकरणाबाबत बोरवणकर यांनी पुस्तकात गौप्यस्फोट करीत तत्कालीन पालकमंत्री ‘दादा’ असा उल्लेख करत अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.तर हे प्रकरण नेमके काय आहे आणि मीरा बोरवणकर यांची पोलीस दलातील कारकीर्द कशी राहिली आहे याबदल अधिक जाणून घेऊ
१९८१ च्या IPS बॅचच्या अधिकारी असणाऱ्या मीरा या त्या बॅच मधील एकमेव महिला अधिकारी होत्या.खरतर मीरा या मूळच्या पंजाबच्या असून पंजाबमधील गुरुदासपूर येथे त्यांचा जन्म झाला आहे.तर त्यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे BSF म्हणजेच बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स मध्ये अधिकारी होते त्यामुळे मीरा चड्डा यांचे बालपण पंजाबमधील फाझिल्का जिल्ह्यात गेले व इथेच त्यांच शालेय शिक्षण झाले.व पुढे महाविद्यालयीन शिक्षण जालंधर इथे झालेआणि महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच भारतातील पहिला महिला IPS किरण बेदी यांना पाहून त्या प्रेरित झाल्या आणि त्याचवेळी त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला व UPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्या.याच दरम्यान त्यांनी IAS अधिकारी अभय बोरवणकर यांच्यासोबत लग्न केले आणि मीरा चड्ढा मीरा बोरवणकर झाल्या.पोलीस सेवेत काम करत असतानाच मीरा बोरवणकर साल १९९४ मध्ये पहिल्यांदा चर्चेत आल्या. त्यावेळी त्यांनी जळगाव सेक्सस्कँडलचा तपास केला होता व ज्यात अनेक नेते आणि प्रभावशाली लोकांचा सहभाग होता.त्यांच्या या कामगिरीने सगळीकडे त्यांचे खूप कौतुक झाले आणि यामुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली.त्यांच प्रमाणे अबू सालेम केस,इक्बाल मिर्ची केस यांसारख्या मोठमोठ्या गंभीर केसेस मध्ये तपास करत त्यांनी त्या योग्य रीतीने सोडवल्या.नंतर त्या जेव्हा मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख झाल्या तेव्हा हे पद मिळवणाऱ्या त्या पहिला महिला होत्या.
मुंबईत त्यांनी अंडरवर्ल्डवर केलेल्या कारवाईमुळे त्यांची कठोर अधिकारी ही प्रतिमा दृढ झाली. त्यांनी दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनच्या अनेक गुंडांना तुरुंगात पाठवले.तर त्यावेळी दाऊदची बहीण हसीना पारकर ही भावाच्या नावावर खंडणी वसुली करत होती या बदलच्या अनेक तक्रारी मुंबई गुन्हे शाखेकडे येत असत.अशीच एक दिवस एका महीलने तक्रार केली व पोलीसांकडे FIR नोंदवल्यावर तक्रार करणारी महिला गायब झाली त्यावेळी मीरा यांनी त्या महिलेचा खूप तपास केला.यामुळे दाऊदच्या बहिणीला मीरा यांची भीती वाटायला लागली होती.नंतर काही दिवसांनी एक रेकॉर्डिंग मीरा यांच्या पर्यंत पोहोचले तेव्हा त्यात हसीना हीने एक विशेष नमाज अदा केला होता व यात मीरा बोरवणकर यांची बदली होऊदे असे बोल्याचे ऐकू येत होते.
अशा प्रकारे मुंबईत असताना त्यांनी गुंडाराज संपवण्यात मोठा वाटा उचलला होता.पुढे मीरा जेव्हा पुण्यात येरवडा तुरुंग महानिरीक्षक झाल्या तेव्हा त्यांनी कैदी असणाऱ्या संजय दत्तला बाहेरून येणारे जेवण बंद करून तुरुंगातील जेवणच दिले होते. तर २०१२ मध्ये दहशतवादी अजमल कसाबला दिलेली फाशी आणि २०१५ मध्ये याकूब मेमनला देण्यात आलेली फाशीची शिक्षा ही त्यांच्या निगराणीतच देण्यात आली होती त्यावेळी मीरा बोरवणकर कारागृह विभागाच्या अतिरिक्त महासंचालक होत्या.तर IPS म्हणून नाशिक,कोल्हापूर,मुंबई,जळगाव,औरंगाबाद, पुणे आणि दिल्ली येथे मीरा बोरवणकर यांची कारकीर्द घडली.१९९७ साली त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.एकदा एका मुलाखतीत त्यांनी असे सांगितले होते की माझं पदव्युत्तर शिक्षण ‘इंग्रजी साहित्य’ या विषयात झाले होते व त्यामुळे मला लेखिका व्हायचं होतं.परंतु ‘टू कील अ मॉकिंग बर्ड’ या पुस्तकाने माझ्या आयुष्यात मोठा बदल घडवला.आपल्या ३६ वर्षांच्या पोलिस सेवेनंतर मीरा बोरवणकर या २०१७ मधेच सेवा निवृत्त झाल्या पण त्यांची ही कारकीर्द अजूनही लोकांच्या आठवणीत आहे.तर “मर्दानी” हा हिंदी चित्रपट मीरा यांच्याच आयुष्यावर आधारित आहे.ज्यात बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिने मीरा बोरवणकर यांची भुमिका साकरली आहे.
आता बघू मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या आत्मचरित्रात केलेल्या गंभीर आरोपाचे प्रकरण नेमके काय आहे ?
मीरा यांनी मॅडम कमिशनर या आपल्या आगामी आत्मचरित्रात पोलिस दलात केलेल्या सेवेचे अनुभव कथन केले आहे.यात त्यांनी मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांमधील गॅंगवार,93 चे मुंबई बॉम्बस्फोट,जळगाव सेक्सस्कँडल यासह अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास कसा केला याबदल लिहिले आहे.तर याच पुस्तकात त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्त असतानाचा एक प्रसंग लिहिला आहे.तो प्रसंग आहे आघाडी सरकारच्या काळातला त्यावेळी मीरा बोरवणकर या पुण्याच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्त बनल्या होत्या.साल २०१० मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त यांनी पुण्यातील येरवडा कारागृहाजवळील पुणे पोलिसांच्या तीन एकर जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता व तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने ही जमीन हस्तांतरित करण्यात येणार होती.मात्र मी या निर्णयाला स्पष्ट नकार दिला होता असा गौप्यस्फोट मीरा बोरवणकर यांनी केला आहे.कारण टु जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सीबीआयने अटक केलेल्या ‘डीबी रिॲल्टी’ या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर शाहीद बलवा यांच्या कंपनीला हा येरवडा पोलीस स्टेशनचा मोक्याचा तीन एकर भूखंड पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय झाला होता.परंतु हे आरोप करताना त्यांनी अजित पवारांचे नाव घेतलेले नाही तर त्यांनी पालकमंत्री दादा असा उल्लेख या पुस्तकात केला आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे व यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी असे सांगितलेआहे की रेडीरेकणर नुसार जमिनीची किंमत ठरवली जाते त्यामुळे या लिलाव प्रकियेत माझा सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही मुळात पालकमंत्र्याना सरकारी जमिनीचा लिलाव करण्याचे अधिकार नसतात हा निर्णय महसूल विभाग आणि मंत्रिमंडळाला आहे.खरतर मंत्री आणि अधिकारी यांच्यातील संघर्ष हे काय राज्यात नवे नाही.त्यामुळे मीरा बोरवणकर यांनी केलेला गौप्यस्फोट हा गंभीर असला तरी हे पहिल्यांदाच झाले आहे असे नाही याआधी सुध्दा पोलिस सेवेतील अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी आत्मचरित्र लिहून गौप्यस्फोट केले होते.मुंबईचे माझी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सुध्दा त्यांच्या लेट मी से इट नाऊ पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत.