International Women’s Day : आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक हॅप्पी वुमन्स डेचे मेसेज पाठवून महिलांना शुभेच्छा देतात, अनेक जण भेटवस्तू देतात आणि अनेकजण सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्टही शेअर करतात, पण तुम्हाला माहित आहे का, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि हा दिवस इतका महत्वाचा का आहे ?

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या माध्यमातून महिलांना स्त्री-पुरुष समानता, प्रजनन हक्क आणि हिंसेपासून संरक्षण मिळवून देण्याचे काम केले जाते. या दिवशी महिला सक्षमीकरणासाठी एकजुटीने काम करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जाते. हा दिवस महिलांचे योगदान आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2023 नुसार, स्त्री पुरुष समानत्यासाठी अजून 131 वर्षे लागतील. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणे आपल्या सर्वांसाठी का महत्वाचे आहे हे या आकडेवारीवरूनच स्पष्ट होते.

महिला दिन हा केवळ एका दिवसासाठी महिलांचे आभार मानण्यासाठी किंवा भेटवस्तू देण्यासाठी साजरा केला जात नाही. महिलांवरील वर्षानुवर्षे होणारा भेदभाव दूर करण्यासाठी आणि त्यांना समाजात समान अधिकार देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांसाठी उठलेल्या आवाजाला पाठिंबा देण्यासाठी हा दिवस आहे. वर्षानुवर्षे मुळं रुजवलेल्या वडिलोपार्जित समाजात अनेक ठिकाणी स्त्रियांना पुरुषांइतके स्वातंत्र्य आणि अधिकार मिळालेले नाहीत, त्यामुळे महिला दिन साजरा करणं अत्यंत गरजेचं आहे.अनेक प्रथा आता संपुष्टात आल्या आहेत, पण आजही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे महिलांना घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नाही. ते स्वत:चे आयुष्य जगू शकत नाहीत. एवढेच नव्हे तर सक्षमीकरणाच्या दिशेने पावले उचलूनही ऑफिसमध्ये लिंगभेद, पुरुषांइतके वेतन न मिळणे अशा अनेक समस्या आजही महिलांना भेडसावत आहेत. खरंतर पुरुषांना निसर्गाने वेगळी शक्ती दिली आहे. आणि स्त्रीला देखील वेगळी शक्ती दिली आहे. अर्थात स्त्री कमकुवत नाहीच… निसर्गाने जिथे भेदभाव केला नाही तो माणसाने केला. पण आता या शक्तीला तिचा मन, स्वतंत्र, अधिकार मिळायला हवा म्हणून महिला दिन हा साजरा करायलाच हवा….