Indira Gandhi Birth Anniversary : भारताच्या राजकारणात अनेक प्रभावशाली महिला होऊन गेल्या आहेत. यामध्ये अग्रस्थानी नाव येतं ते म्हणजे भारताच्या ‘आयर्न लेडी’ म्हणजेच इंदिरा गांधी यांचं. इंदिरा यांना जितका मान-सन्मान मिळाला, तसा एकदा त्यांचा अपमान सुद्धा झाला होता. ते देखील त्या पंतप्रधान असताना, जेव्हा इंदिरा रशिया दौऱ्यावर गेल्या होत्या. भारताच्या पंतप्रधान म्हणून झालेल्या या आपमानाचा इंदिरांनी अगदी शांतपणे आणि शालीन बदला घेतला. त्या दिवशी काय घडलं होतं? जाणून घेऊया.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर काँग्रेस पक्षात इंदिरांचं वर्चस्व वाढलं. त्या काळात इंदिरा संपूर्ण देशाच्या नेत्या म्हणून उदयास आल्या. त्यानंतर, लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. पण 1966 मध्ये शास्त्रींचा अचानक मृत्यू झाल्याने इंदिरा देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ जगभर गाजला होता.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना एक घटना घडली होती, ज्याविषयी अनेकांना माहिती नाही, तो म्हणजे इंदिरांच्या अपमानाचा. इंदिरा यांना पंतप्रधान होऊन सहाच महिने झालेले. जुलै, 1966 साली ही घटना घडली, जेव्हा त्या सोव्हिएत रशियाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. मॉस्को विमानतळावर त्या उतरल्या. त्यावेळी तिथे रशियाचे पंतप्रधान उपस्थित असणं अपेक्षित होतं.
हे वाचलेत का ? World Men’s Day : 19 नोव्हेंबरला ‘जागतिक पुरुष दिवस’ साजरा होतो आहे ! नेमका का साजरा होतोय जाणून घ्या
प्रोटोकॉलचनुसार, एका देशाचे पंतप्रधान जेव्हा दुसऱ्या देशात जातात तेव्हा त्यांचं स्वागत तिथल्या पंतप्रधानांनी करायला हवं. पण त्यावेळी असं घडलंच नाही. उलट इंदिरा गांधींच्या स्वागताला तिथले कनिष्ठ मंत्री उपस्थित होते. हा इंदिरांचा अपमान होता. या दौऱ्यावर त्यावेळी इंदिरा यांच्या सोबत इंदर कुमार गुजराल देखील आले होते. इंदिरांनी गुजराल यांना विचारलं, “माझी राहण्याची व्यवस्था कुठे आहे?” त्यावर क्रेमलिनमध्ये राहण्याची सोय केली असल्याचं गुजराल यांनी सांगितलं.

त्यानंतर इंदिरांनी, “इथला भारतीय दुतावास किती मोठा आहे?” असा प्रश्न विचारला. गुजराल म्हणाले, “बऱ्यापैकी मोठा आहे. साधारण वीस-पंचविस भारतीय कर्मचाऱ्यांच्या फॅमिली राहतील इतका मोठा दुतावास आहे.” हे ऐकताच इंदिरांनी क्रेमलिनमध्ये न जाता थेट भारतीय दुतावासात आपला मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला.
पण तिथं गेल्यावर इंदिरांनी ‘इथं लहान मुलं नाही आहेत का’ असं विचारलं. मग काय पंतप्रधान इंदिरा गांधी सांगत आहेत म्हंटल्यावर लगेचच तिथल्या लहान मुलांना बोलावण्यात आलं. सगळी लहान मुलं तिथे गोळा झाल्यानंतर इंदिरा त्यांच्याशी गप्पा मारू लागल्या, खेळू लागल्या. तर तिकडे क्रेमलिनमध्ये इंदिरा गांधी येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी रशियन मंत्री व अधिकारी वाट पाहत होते.
मात्र, एअरपोर्टवरून गाडी क्रेमलिनमध्ये आलीच नाही म्हंटल्यावर रशियन अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर इंदिरा गांधी भारतीय दूतावसात असल्याचं सर्वांना समजलं. पण दुसऱ्या देशाच्या पंतप्रधान आपल्या देशात आल्या असताना, इथे न येता त्या थेट भारतीय दूतावसात का गेल्या? याचा अर्थ काहीतरी चूक झाली असावी अशी चर्चा रशियात रंगली. मग आपण प्रोटोकॉल पाळला नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

आपली चूक लक्षात येताच तेव्हाचे सोव्हिएत रशियाचे प्रमुख लेओनिड ब्रेन्झेव्ह होते. ब्रेन्झेव्ह व त्यांच्या पत्नीने इंदिरांची भेट घेतली. इंदिरा यांची माफी मागितली आणि क्रेमलिनमध्ये येण्याची विनंती सुद्धा केली. त्यांच्या विनंतीचा मान राखत इंदिरा यायला तयार झाल्या. पण त्यांनी असं का केलं असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यावेळी इंदिरा स्पष्ट म्हणाल्या, “हा अपमान फक्त इंदिरा गांधीचा नव्हता, हा संपूर्ण भारताचा अपमान होता. भारतीयांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असं काहीही मी सहन करू शकत नाही.”
इंदिरा गांधींनी दिलेल्या या उत्तराने रशियाला आपली चूक उमगली. पण यानंतर मात्र रशिया आणि इंदिरा गांधी यांच्यात कधीही कटुता आली नाही. पण आपला अपमान झाला म्हणून कोणताही संताप न करता शांतपणे आपल्या कृतीतूनही अपमानाचा बदला घेता येतो, असा धडा त्यांनी सोव्हिएत रशियाला शिकवला.
