मुंबई : दूरदर्शनच्या अखत्यारित असलेल्या डीडी न्यूज DD News या सरकारी चॅनेलच्या लोगोमध्ये केलेल्या बदलामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठली आहे. डीडी न्यूजने नुकताच आपला नवा लोगो लाँच केला आहे. नव्या लोगोचा रंग रुबी रेडवरून भगवा करण्यात आला आहे. सरकारी चॅनेलचे भगवेकरण केल्याबद्दल राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे.
दुसरीकडे, ब्रॉडकास्टरने हा मुद्दा केवळ बदल म्हणून सादर केला असल्याचे म्हंटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा बदल अंमलात आणण्याची गरज काय, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.
मंगळवारी संध्याकाळी डीडी न्यूजने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर व्हिडिओ संदेशासह आपला नवीन लोगो पोस्ट केला. आमची मूल्ये तशीच असली तरी आता आम्ही नव्या अवतारात उपलब्ध आहोत. आधी कधीही न पाहिलेल्या बातम्यांच्या सहलीसाठी तयार व्हा. “वेगापेक्षा अचूकता, दाव्यांपेक्षा तथ्य, सनसनाटीपेक्षा सत्य… कारण डीडी न्यूजवर असेल तर ते खरं! डीडी न्यूज – भरोसा सच का. असे पोस्टमध्ये लिहिले आहे.
२०१२ ते २०१४ दरम्यान प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जवाहर सरकार म्हणाले, “राष्ट्रीय प्रसारकाने आपला ऐतिहासिक फ्लॅगशिप लोगो भगव्या रंगात रंगवला आहे. त्याचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने मी त्याचे भगवेकरण काळजीने पाहत आहे आणि अनुभवत आहे – ती आता प्रसार भारती नाही, ती प्रचार भारती आहे !