अयोध्या : रामनवमी दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा रामनवमी 17 एप्रिलला आहे. शास्त्रांनुसार प्रभू श्रीरामांनी याच दिवशी अवतार घेतला होता. त्यामुळे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. यंदाची रामनवमी भाविकांसाठी खूप खास असणार आहे. कारण जन्मभूमीत बांधलेल्या राम मंदिरात प्रदीर्घ काळानंतर प्रभू श्रीराम विराजमान आहेत.
यंदा अयोध्येत रामनवमीच्या निमित्ताने अतिशय खास देखावा पाहायला मिळणार आहे. या शुभमुहूर्तावर प्रभू रामाला 56 भोग अर्पण करण्यात येणार आहेत. तसेच सुर्याभिषेक करण्यात येणार आहे. त्यासाठी राम मंदिराची जय्यत तयारी सुरू आहे.
रामनवमीला रामलल्लाला सूर्यअभिषेक करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आणि ग्रहांचा राजा मानला जातो. जेव्हा भगवान सूर्याची किरणे भगवंताचा अभिषेक करतात, तेव्हा उपासनेची आणि देवतेची भावना जागृत होते. या पद्धतीला सूर्य अभिषेक म्हणतात. रामजन्मोत्सवाला सूर्याची किरणे रामलल्लाच्या कपाळावर 4 मिनिटे पडतील.
असे मानले जाते की, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी बारा वाजता भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता, त्या काळात सूर्यदेव त्यांच्या पूर्ण प्रभावात होते. असे मानले जाते की सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा आणि पाणी केल्याने साधकाला जीवनात शुभ फळ प्राप्त होते. तसेच कुंडलीत उपस्थित सूर्याची स्थितीही मजबूत असते.