तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेतली होती असा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दोन आठवड्यापूर्वी केला होता.तर दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकील जय अनंत देहदराई जे महुआ मोईत्रा यांचे पूर्वीचे मित्र होते,त्यांच्या पत्राच्या आधारे हा आरोप केला असून यामुळे महुआ मोईत्रा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आणि याच मुद्द्यावरून दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती.तर मोईत्रा यांच्यावरील आरोपांचे हे प्रकरण गंभीर असल्याने याची तात्काळ दखल घेत संसदीय समितीने मोईत्रा यांना आता चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.त्यामुळे मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.तर महुआ मोईत्रा यांच्यावर करण्यात आलेला हा आरोप नक्की काय आहे व यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते हे संपुर्ण प्रकरण जाणून घेऊ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांना लक्ष्य करण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारले व या बदल्यात हिरानंदानी यांच्याकडून महुआ मोईत्रा यांनी काही रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्या आहेत असा गंभिर आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला असून,यासंदर्भात लाच व्यवहाराचे पुरावे सादर करत त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहले होते व या पत्रात दुबे यांनी असे म्हटले होते की अलीकडच्या काही दिवसात महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत विचारलेल्या ६१ प्रश्नांपैकी ५० प्रश्न हे अदानी समूहावर विचारले आहेत व त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी,कारण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे जे पैशाच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारण्याशी संबंधित २००५ च्या ‘कॅश फॉर क्वेरी’ या घटनेची आठवण करून देते व यामध्ये त्यावेळी काही खासदारांना सदस्यत्व गमवावे लागले होते असे दुबे यांनी आपल्या पत्रात लिहिले होते.
२००५ साली घडलेले हे प्रकरण नक्की काय होते? तर त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात केंद्रात यूपीए सरकार सत्तेवर होते आणि २००५ च्या डिसेंबर महिन्यात एक स्टिंग ऑपरेशन समोर आले आणि संसदेत एकच खळबळ उडाली होती.त्यावेळी कोब्रा पोस्ट नावाच्या डिजिटल पोर्टलने हे स्टिंग ऑपरेशन केले होते व या स्टिंग ऑपरेशनचे टायटल ‘ऑपरेशन दुर्योधन’ असे होते.या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही खासदार पैशाच्या बदल्यात एका कंपनीला प्रमोट करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले होते.तर या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यावेळी ज्या खासदारांची नावे समोर आली होती त्यात भाजपचे सहा,काँग्रेसचे ४ आणि आरजेडीचा १ असे एकूण ११ खासदार होते,आणि एका वृत्तवाहिनीने हे स्टिंग ऑपरेशन त्यावेळी ऑन एअर केले होते. व त्यानंतर लगेच तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संसदीय समिती स्थापन केली होती.ज्यामध्ये या खासदारांचे वर्तन अनैतिक होते हे सिद्ध झाल्याने ११ जणांची खासदारकी रद्द करण्यात आली होती.आणि यांचाच संदर्भ देत याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांनी चौकशी समिती स्थापन करावी,अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे.
मात्र दुबे यांनी केलेले हे आरोप महुआ मोइत्रा यांनी फेटाळून लावले आहेत व दुबे यांच्यावर पलटवार करत मोइत्रा यांनी दुबे यांची विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची चौकशी करावी अशी विनंती लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना केली आहे.तर मोइत्रा यांनी अशी मागणी करण्याचे कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात निशिकांत दुबे यांनी एका खासदाराच्या विरोधात अपशब्द वापरल्यामुळे दुबे यांच्यावर विशेषाधिकार समितीकडे तक्रार दाखल करण्यात आलेली होती.त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत काल बुधवारी संसदीय नैतिक आचारसंहिता समितीची बैठक पार पडली व यावेळी समितीचे अध्यक्ष भाजप खासदार विनोदकुमार सोनकर यांनी सांगितले की ३१ ऑक्टोबरला महुआ मोईत्रा यांनी समीतीने चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आला आहे,व त्यामध्ये त्या आपली बाजू मांडतील आणि मग समितीचा तपशिल माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि गृह मंत्रालयाला पाठवला जाईल.
तर याप्रकरणी महुआ मोईत्रा या ज्या पक्षाच्या खासदार आहेत त्या तृणमूल काँग्रेस पक्षाने महुआ मोईत्रा यांना जाब विचारलाय,अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डेरेक ओब्रायन यांनी दिलीय.आणि याप्रकरणी पक्ष लवकरच योग्य तो निर्णय घेईल,असेही ओब्रायन म्हणाले.त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर आता महुआ मोईत्रा अडचणीत आल्या आहेत हे नक्की.आणि २००५ च्या ‘कॅश फॉर क्वेरी’ चा संदर्भ लक्षात घेतला तर महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात आहे.आता ३१ ऑक्टोबरला जेव्हा महुआ मोईत्रा यांची चौकशी होईल आणि त्यानंतर संसदीय समिती नक्की काय अहवाल देते हे पहावे लागेल.