आता कित्येक नागरिकांना प्रश्न पडला असेल कि नेमके मनोज जरांगे आहेत तरी कोण ? तर मनोज जरांगे हे जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील रहिवासी आहेत. ते गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी ते काँग्रेस पक्षात काम करत होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवबा संघटनेची स्थापन केली.
जरांगे पाटील हे 2011 या वर्षापासून मराठा आरक्षणाच्या चळवळीत आहेत. त्यांच्या 2024 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर एक भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला चांगलाच घाम फोडला होता. त्यांनी आत्तापर्यंत 35 हून अधिक मोर्चे व आंदोलने केली आहेत, आणि आता पुन्हा मराठा आरक्षणावरून ते चर्चेत आले आहेत.
मराठा समाजाने आरक्षणाचा मुद्दा लावून धरल्याने राजकीय नेत्यांना देखील घाम फुटला आहे. मराठा बांधवानी आरक्षण मिळावं यासाठी आज (मंगळवार 31 नोव्हेंबर 2023) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यापार्शवभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे.
तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी बीड आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या हिंसक निदर्शनेनंतर मंत्र्यांची आणि त्यांच्या मालकीच्या मालमत्तेची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी त्यांनी कुठे आंदोलनं केली आहेत ?
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार 2014 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केल्या गेलेल्या अनेक आंदोलनांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सहभाग नोंदवला होता.
एवढंच नाही तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर देखील अनेक आंदोलनं केलेली होती मात्र त्यांच्या या आंदोलनांना मोठा पाठिंबा मिळालेला दिसला नाही.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून झाल्याचं माध्यमांनी सांगितलंय. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवबा संघटनेची स्थापना केली आणि जालना जिल्ह्यामध्ये या प्रश्नावर मराठा तरुणांना एकत्रित आणण्याचं काम सुरु केलं.
नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता.
2014मध्ये त्यांनी शहागड ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगरमध्ये काढलेला मोर्चाही गाजला होता.
त्यांनी ज्या ज्या गावात आंदोलनं केली त्या त्या गावांमध्ये राहणारे लोक त्या आंदोलनात सहभागी होत असत. 2021मध्ये जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगाव या गावात मनोज जरांगे पाटील यांनी तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं.
त्याच आंदोलनात त्यांनी सहा दिवस उपोषणही केलं होतं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती.
साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी केलेल्या आंदोलनाची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. वडीकाळ्या आणि भांबेरी या गावात त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती.
आंदोलनांना लोकांचा पाठिंबा का मिळतो ?
दैनिक लोकसत्ता मध्ये दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे देखील या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे.
कापूस, सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. शिकलेली मुले शहरात स्पर्धा परीक्षेत गुंतले आहेत किंवा गावातच शेतीमध्येही प्रयोग करुन पाहत आहेत.
पण या प्रयत्नांना यश मिळत नाही. त्यामुळे गावोगावी विवाह न झालेल्या शेतकरी तरुणांची संख्या मोठी आहे. या सर्व मुलांना आपले प्रश्न फक्त आरक्षणाच्या माध्यमातूनच सुटू शकतात असं वाटतं आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठी गर्दी जमते असं अनेकांचं मत आहे.
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी अंतरवली येथे त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते.
आंदोलकांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते.
उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली.
पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर पोलिसांवरही दगडफेक केल्याचे आरोप आंदोलकांवर लावण्यात आले.
आंदोलनाविषयी विचारल्यावर जरांगे म्हणाले, “3 महिन्यात मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊ, असं सरकारनं आश्वासन दिलं होतं. 3 महिने उलटून गेले पण आरक्षणासाठीच्या समितीनं काही काम केलं नाही. आरक्षण घेईपर्यंत आम्ही हलणार नाही.”
त्यांनी सांगितलं, “सरकारकडून आमच्यावर खूप मोठा हल्ला करण्यात आला. गोळीबार करण्यात आला. आमच्या गावातले खूप लोक त्यात जखमी झाले. आमच्या लोकांची डोकी फोडून त्यांना काय मिळालं माहिती नाही. आमचं आंदोलन ते मोडीत करायला निघाले, पण आज महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आमच्या पाठीशी उभा राहिलाय.”
पण, गावकऱ्यांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं म्हटलं जात आहे, असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं, “लोकांनी पोलिसांना हाणलं असं गृहमंत्री सांगत आहेत. पण पोलिसांनी आमचे लोक दांड्याखाली तुडवलेत.”
मराठा आरक्षणाचा अध्यादेश हवा, गावकऱ्यांवरील पोलिस केसेस माघारी घेतल्या पाहिजेत आणि गावात आलेले सगळे पोलिस कर्मचारी बडतर्फ केले पाहिजे, या 3 प्रमुख मागण्यांसह मराठा आरक्षणासाठीचं उपोषण सुरुच ठेवणार असल्याचंही जरांगे यांनी तेव्हा म्हटलं होतं.