नागपूर : गणपती बाप्पा येताना स्वतःबरोबर दरवर्षीप्रमाणे पाऊस देखील घेऊन आले आहेत. महाराष्ट्रामध्ये काही भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये नागपुरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये अवघ्या चार तासात 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच नागपूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढल आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक नागरिकांच्या घरात पाणी देखील शिरले आहे नागपूर शहरातील महावितरणचे शंकर नगर आणि इतर अनेक सबस्टेशन आणि वीज यंत्रणा देखील पाण्यात गेली आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1705408976819790230?s=20
अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे महावितरणला रात्री दोन वाजल्यापासून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करावा लागला आहे. अवघ्या चार तासात 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून पावसाचा जोर अद्याप देखील कमी झालेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दक्षतेचे निर्देश दिले आहेत.
शहरात झालेल्या मुसळधार पावसाने सद्यस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला निर्देश दिल्या असून, नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर आणि मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्य सुरू केले आहे. एनडीआरएफ आणि पथकाने देखील बचाव कार्यात सहभाग घेतला आहे. तसेच मदतीसाठी हेल्पलाइन नंबर देखील जारी करण्यात आले आहेत.