मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका निळ्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल शनिवारी आला होता. या कॉलनंतर सुरक्षा रक्षक अलर्ट मोडवर आले , आणि विमानतळाचा कानाकोपरा पिंजून काढला. दरम्यान संशयास्पद कोणतीही वस्तू आढळून न आल्याने हा केवळ खोडसाळपणा असल्याचा अंदाज शोधपथकाने व्यक्त केला आहे.
राज्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोन वर एका निळ्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी कॉल शनिवारी सायंकाळी सहा वाजता आला होता. यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष आणि विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थापकांना याविषयी माहिती दिली. श्वान पथक बॉम्बशोधक पथक आणि नाशपथकाने विमानतळावरील कानाकोपरा तपासून पाहिला, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे खोडसाळपणा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचे 35000 कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल आणि इतर सुरक्षा एजन्सीचे अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले असून फोर्स वन सारख्या कमांडो तुकड्या देखील नियंत्रण कामात आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.