पुणे : पुण्यातील मोशी परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मोशीतील मिंत्रा सोसायटीमध्ये राहणाऱ्या अर्णव पाटील या पाच वर्षीय मुलाचा गणेश विसर्जनासाठी बनवण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये पडून मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील मोशी या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी गुरुवारी सायंकाळी या पाच वर्षीय चिमुकल्याचा हौदात बुडून मृत्यू झाला. अर्णव पाटील असं या चिमुकल्याच नाव असून महानगरपालिकेकडून कृत्रिम विसर्जन हौद दरवर्षीप्रमाणे तयार करण्यात आला होता. अनेक जण या ठिकाणी गणपती विसर्जन करत असताना अर्णव या हौदाजवळ गेला. या हौदाजवळ त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला परंतु त्याला योग्य वेळी पाण्यातून बाहेर न काढता आल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे समजते आहे.
या घटनेने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे.