मुंबई : पेट्रोल Petrol आणि डिझेलचे Diesel दर हे सध्या गगनाला भिडले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. महागाईने एकीकडे सर्वसामान्यांच कंबरड मोडलं असताना, आता केंद्र सरकारने काहीशी दिलासादायक बातमी दिली आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने आज हा निर्णय जाहीर केला असून शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 सकाळी सहा वाजल्यापासून हे नवीन दर लागू होणार आहेत. यामध्ये मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सध्या 106.31 आहे ते आता 104.2 रुपये झाले आहेत. तर डिझेलचा दर महाराष्ट्रात 94.27 आहे तो घटून आता 92.15 झाला आहे. सामान्यांसाठी ही काहीशी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, परंतु विरोधकांनी मात्र या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारला चांगलंच फटकारल आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळेच विरोधक कडाडून टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी या इंधन दर कपातीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, ” निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे हे आता नीत्याचेच झाले आहे. वाढलेले 40 रुपये व कमी केलेले 2 रुपये महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला स्पष्ट दिसते. कमी झालेले दोन रुपये पुन्हा वाढणार नाहीत याची गॅरंटी काय ? ” असा खोचक सवाल देखील जयंत पाटलांनी केला आहे.