पुणे : पुण्यात महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना यांना अभिवादन करुन रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. पुण्यातून या यात्रेला सुरुवात होत असून नागपूरला या यात्रेची सांगता होणार आहे. पुणे ते नागपूर ज्या जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे, त्या जिल्ह्यातील तरुणांना या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
तरुणांसाठी बेरोजगारी , रखडलेली भरती प्रक्रिया, अवाजवी परीक्षा शुल्क, क्रीडा विभागाचं सक्षमीकरण, नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे अशा अनेक प्रमुख मागण्यासाठी हा युग संघर्ष मोर्चा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेत तरुणांचा मोठा सहभाग देखील आहे.
आमदार रोहित पवार यांनी तरुणांसाठी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये कंत्राटी नोकरभरती रद्द करवि यासह ,2 लाख 50 हजार उमेदवारांची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी, अवाजवी परीक्षा शुल्क रद्द करण्यात यावे, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, सक्षम आणि कार्यक्षम आरोग्य व्यवस्था उभी करण्यात यावी, होतकरू खेळाडूंना संधी मिळावी, पेपरफुटी विरोधात कायदा बनवावा, शाळा दत्तक योजना रद्द करण्यात यावी, बेरोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी मिळावी, समुह शाळा योजना रद्द करण्यात यावी, रखडलेल्या नियुक्त्या त्वरित देण्यात याव्यात, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणावा, सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRTI संस्थाचे सक्षमीकरण व्हावे, नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखण्यात यावा, TRTI संस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद मिळावी, सर्व भरती प्रक्रिया MPSC मार्फत करण्यात यावी, प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असावी, शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, युवा आयोगाची स्थापना करण्यात यावी, महिलांची सायबर सुरक्षा सक्षमपणे राबिविण्यासाठी, तालुका स्तरावर MIDC ची स्थापना आणि अस्तित्वात असणाऱ्या MIDC च्या सक्षमीकरणासाठी, आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली तरुणाईला वाचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतो आहे.
हा युवा मोर्चा पुणे ते नागपूर असा हा 800 किलोमीटरचा प्रवास करणार असून, एकूण 45 दिवसांचा प्रवास असणार आहे. पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.