जालना : मनोज जरांगेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. मनोज जरांगे म्हणाले, एकीकडे गोड बोलायचे, दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे. त्यांच्यामुळेच भाजप संपत आहे. स्वतःला उच्च नेता समजतो आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल करतो. तू उच्च नेता आहेस की खाली चिठ्ठ्या वाटायच्या लायकीचा आहे हे लवकरच कळेल.
जालना जिल्ह्यातही इंटरनेट सेवा बंद, दोन दिवस सेवा बंद ठेवण्याचे सरकारचे आदेश दिले आहेत. यावर जरांगे म्हणाले, मराठा आंदोलन दडपण्यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मराठा समाजाचे आंदोलन मोडण्याचा हा डाव आहे. मराठा आरक्षण भेटल्या शिवाय हटणार नाही. हजारो लोकांनी मला रात्री खडा पहारा दिला आहे. इंटरनेट बंद करून आंदोलन मोडू शकत नाही. 100 टक्के मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा डाव दिसतोय, कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडवणार नाही.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाही मिळाली तर संध्याकाळपासून पाणीही सोडणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा आंदोलन शांततेतच होणार, आरक्षण मिळाल्या शिवाय आंदोलन थांबवणार नाही. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही, असंही जरांगे म्हणाले. दोनपैकी एक उपमुख्यमंत्री मोठे कलाकार, रंगीबेरंगी लोकांना घेऊन भाजपची वाट लावली असे म्हणत फडणवीसांचं नाव न घेता मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला आहे.
लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, बैठक बोलावण्याची दुसरी वेळ आहे. सर्वांनी स्पष्ट करावे तुम्ही आरक्षण देणार आहे की नाही किती वेळ लागणार आहे हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. नेत्यांनी मुंबई सोडू नये. लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे.
बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर राहत असलेल्या बंगल्याला आग लावली.तसेच 72 एसटी जाळण्यात आले. याविषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारचे लोक हिंसा करत आहेत. बीडच्या केज मधील आंदोलक विनाकारण उचलून नेले आहे.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.