जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सगे सोयरे याबाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान सध्या त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येते आहे.
पंधरा तारखेला राज्य सरकारचे मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन
राज्य सरकारने 15 फेब्रुवारीला मराठा आरक्षण याबाबत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की,” पंधरा तारखेला विशेष अधिवेशन घेतलं नाही तर कळेलच ! मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून सरसकट आरक्षण द्यावे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे. सर्व मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, बाराशे-तेराशे लोकांसाठी वेगळा कायदा करा. तसेच 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद या संदर्भात मला माहिती नाही. पण तसा काही महाराष्ट्र बंद होत असेल तर शांततेत बंद करावा असे देखील मनोज जरा पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अमित शहा यांच्याशी आमचे देणे घेणे नाही मराठा काय आहेत त्यांना कळेल असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
येत्या 15 फेब्रुवारीला एक दिवसाचे विशेष अधिवेशन मराठा आरक्षण या विषयावर बोलवण्यात आला आहे. दरम्यान या अधिवेशनामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या परिस्थितीनुसार अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरूच असून त्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे.