अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या जिल्ह्याचे नाव अर्थात अहमदनगरच नाव बदललं जावं अशी मागणी अहमदनगरकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून देखील होत होती. यावर अखेर आज निर्णय झाला असून अहमदनगरचे नाव आज पासून पुढे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असे करण्यात आले असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याने महाराष्ट्रामधून आनंद व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान आता अहमदनगरचे नाव देखील बदलण्यात आले आहे. ही एक अभिमानास्पद घटना अहमदनगरच्या इतिहासात लिहिली गेली आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक नेते यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले. ते म्हणाले कि, ” अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. ”
” हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. ” मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.