नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील नारायण निरयत इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या समूह कंपन्या आणि तिच्या संचालकांविरोधात ११ ठिकाणी ईडीने ED आज छापे टाकले आहेत. त्यांच्यावर युको बँकेच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमची १०९.८७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नारायण निरयत इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या समूह कंपन्या आणि संचालकांच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदोर, जौरा आणि मंदसौर आणि महाराष्ट्रातील आलोका येथील घरांवर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ च्या तरतुदींनुसार छापे टाकण्यात आले.
या छाप्यात विविध आक्षेपार्ह कागदपत्रे, हिशेबाची पुस्तके आणि स्थावर, जंगम मालमत्तेचा तपशील जप्त करण्यात आला आहे. संबंधित कंपनीविरोधात दाखल एफआयआर आणि केंद्रीय अन्वेषण विभाग, एसी-४, व्यापमं, भोपाळ यांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने तपास सुरू करण्यात आला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २०११ ते २०१३ या कालावधीत या कंपनीने युको या बँकांच्या समूहाकडून लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) आणि एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिट (ईपीसी) स्वरूपात सुमारे ११०.५० कोटी रुपयांच्या क्रेडिट सुविधांचा लाभ घेतल्याचे तपासात समोर आले आहे. जमीन घोटाळ्याबरोबरच आता अनेक बँकांचे कर्ज घेण्याच्या नावाखाली या भूमाफियांनी मोठी फसवणूक केल्याचे ही सक्तवसुली संचालनालयाला समोर आले आहे.
त्याचवेळी कैलास गर्ग याने आपले नातेवाईक सुरेश गर्ग यांच्यासह मेसर्स नारायण एक्सपोर्ट इंडियन कंपनी मंदसौरच्या नावाने युको बँकेसह तीन बँकांशी करार करून ११० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ज्या हेतूने निधी मंजूर करण्यात आला होता, त्या निधीचा वापर कंपनीने केला नाही आणि बँकेचे कर्ज मिळविण्यासाठी बनावट खातेपुस्तके सादर केली.
या लोकांनी संबंधित बँकांची फसवणूक केली आणि कोणत्याही मालाचा व्यवहार न करता ही रक्कम विविध सहयोगी कंपन्यांकडे हस्तांतरित केली. तसेच बँकांकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेचा काही भाग बँकांना कोणतीही माहिती न देता थर्ड पार्टीला विकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही कंपनी जाणूनबुजून गुन्ह्याच्या उत्पन्नाशी निगडित प्रक्रिया आणि कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले.