हरियाणा : हरियाणातील महिंद्रगड येथून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. एका अपघातामध्ये शालेय आठ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 15 हून अधिक मुलं जखमी झाले आहेत. आणखी दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे.
संतापजनक म्हणजे हा स्कूलबस चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. अशी माहिती मिळते आहे. हरियाणातील महेंद्रगड येथील कनिका शहरात जी एल पब्लिक स्कूल आहे या स्कूलची ही बस होती. ही बस सुमारे 35 विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत निघाली होती. दरम्यान उन्नी गावाजवळ हा अपघात झाला असल्याचे समजते आहे. या अपघातात दुर्दैवाने पाच मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मुलांना रुग्णालयात नेल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे लक्षात येते.
याप्रकरणी महेंद्रगडचे एसपी अर्श वर्मा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या स्कूल बसचा चालक हा मध्यधुंद अवस्थेत होता. या स्कूलबस चालकाचे मेडिकल केले जाणार आहे. त्यानंतर सत्य समोर येईलच. त्याचबरोबर वाहनाची कागदपत्र देखील अपूर्ण होती, त्याची देखील चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाहन चालक बस अत्यंत वेगाने चालवत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस एका झाडावर जाऊन आदळली आणि बसने पलटी देखील मारली. यामध्ये काही मुलं ही रस्त्यावर पडली. या घटनेचा आता अधिक तपास सुरू आहे. परंतु दुर्दैवाने चूक कोणाचीही असली तरीही आठ मुलांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. अद्याप देखील अनेक मुलं जखमी असून दोन मुलांची प्रकृती अत्यावशता आहे.