नवी दिल्ली : एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून इमारतीची तपासणी केली, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही.
दरम्यान धमकी देणारा हा ईमेल खोटा असल्याचे जाहीर करण्यात आले. हा ई-मेल एमएचएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मिळाला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.
नॉर्थ ब्लॉक हा दिल्लीतील सर्वात सुरक्षित भाग म्हणून ओळखला जातो. अनेक मंत्रालये आहेत. त्याभोवती राष्ट्रपती भवन, संसदही आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्ली-एनसीआरमधील शाळा आणि राजधानीतील रुग्णालयांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल आले होते. यावेळी सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यानंतर काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल आले.