Oppenheimer : नुकताच २१ जुलै ते २२ जुलै दरम्यान देशात सर्वत्र २ हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर पासूनच यांची जोरदार चर्चा आणि त्याहूनही जोरदार प्रमोशन सुरु होतं. हे दोन चित्रपट म्हणजे ‘बार्बी'(barbie) आणि ‘ओपेनहायमर'(Oppenheimer). या दोन्ही चित्रपटांचा चाहता वर्ग मोठा आहे. ‘बार्बी’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. तर ‘ओपेनहायमर’ हे दुसऱ्या महायुध्दा दरम्यान अणुबॉम्ब (Atomic bomb during World War II) बनविणाऱ्या शास्त्रज्ञावर (scientist)चित्रित करण्यात आला आहे. ओपेनहायमर थेटरमध्ये कसा आणि कोणत्या जागी बसून बघावं यावर देखील सल्ले देण्यात येत आहे. त्याबरोबरच या चित्रपटात भगवद्गीतेच्या एका श्लोकचा उल्लेख आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटात एका सीनमध्ये ओपेनहायमर सेक्स करताना संस्कृत वाक्य वाचताना दाखविण्यात आलेला आहे. यावरून देखील हा चित्रपट भारतात वादात अडकला आहे. जोरदार चर्चेत असणारा ‘ओपेनहायमर’ ज्या शास्त्रज्ञावर चित्रित झालेला आहे त्याचा आणि भगवद्गीतेचा काय संबंध आहे? ओपेनहायमर कोण आहे? अशी अनेक प्रश्न तुम्हाला पडली असतील. यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
First atomic bomb test:पहिली अणुबॉम्ब चाचणी
१५ जुलै १९४५ च्या रात्री ओपेनहायमर केवळ ४ तास झोपले होते. कारण दुसऱ्या दिवशी त्यांच्या ६ वर्षाच्या मेहनतीचं फलित दिसणार होतं. अणुबॉम्ब चाचणीच्या दिवसाची पहाट झाली. गेल्या ६ वर्षात त्यांचं वजनही कमी होऊन ५२ किलोवर आलं होतं. ते चिंतेत व्याकूळ होऊन मेक्सिकोच्या एका बंकरमध्ये येरझाऱ्या मारू लागले, तितक्यात काऊंटडाऊन सुरु होऊन बंकरहुन १० किलोमीटर अंतरावर स्फोट झाला. १६ जुलै १९४५ ला सकाळी ५:३० च्या सुमारास अमेरिकेतील मेक्सिकोच्या वाळवंटात जगातील पाहिली अणुबॉम्ब चाचणी झाली. या चाचणीला ‘ट्रिनिटी’ नाव देण्यात आलं असून जे. रॉबर्ट ओपेनहायमर नावाच्या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वात हा प्रोजेक्ट सुरु होता. अणुबॉम्बचा स्फोट ०.३ TNT पर्यंत होणार असल्याचा अंदाज ओपेनहायमर यांनी लावला होता. मात्र हा स्फोट झाला तेव्हा ते १५ ते २० किलोटन्स TNT एवढा होता. म्हणजे अंदाजाच्या ५० पट्टीने जास्त भयंकर झाला होता. हा स्फोट इतका भयंकर ठरला की या स्फोटमधून निघणाऱ्या गरम हवेमुळे घटनास्थळी असणारा स्टील टॉवर देखील वाफेत रूपांतरित झाला होता. तसंच या स्फोटच्या लहरी १६० किलोमीटर दूरपर्यंत जाणवल्या होत्या. स्फोटमधून मशरूमच्या आकाराचा धूर १२ किलोमीटर वर उंच आकाशात गेला होता. हे सगळं पाहून ओपेनहायमरला धक्का बसला आणि त्यांनी भावूक होऊन भगवद्गीतेतील एक ओळ उच्चारली. ती म्हणजे “Now I am become death, the destroyer of worlds. ” याचा अर्थ “मी आता काळ बनलो आहे, जो जगाचा विनाशकर्ता आहे.”, असा होतो.
(Oppenheimer) ओपेनहायमरची ओळख
ओपेनहायमर यांना फादर ऑफ अॅटोमिक बॉम्ब म्हणजे ‘अणुबॉम्बचा जनक’ म्हणून ओळखलं जातं. ज्या प्रोजेक्टमध्ये जगातील पहिला अणुबॉम्ब बनविण्यात आला होता त्या मॅनहॅटन प्रोजेक्टचे ते संचालक होते. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना चाईल्ड जिनियस ओळखले जात होते.
ओपेनहायमरचे सुरुवातीचे जीवन
ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म १९०४ ला न्यूयॉर्कच्या श्रीमंत जर्मन जुईश कुटूंबात झाला. ओपेनहायमर हे लहानपणापासूनच अतिशय हुशार असून केवळ ९ वर्षाचे असताना फिलॉसफी तर वयाच्या १० व्या वर्षापासूनच ते भौतीकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा अभ्यास करत होते. त्याबरोबरच त्यांना मिनरॉलॉजीचंही ज्ञान होतं. केवळ वय वर्ष १२ असतानाच त्यांना न्यूयॉर्कच्या मिनरॉलॉजी क्लबमध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होत. १९२२ ला हार्वर्ड विद्यापाठीमध्ये त्यांनी ४ वर्षाची पदवी ३ वर्षात पूर्ण केली. स्वतःच्या वर्गात ते नेहमी टॉपर असायचे. रसायनशास्त्र या विषयात त्यांनी पदयुत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यासोबतच फिलॉसॉफी, लीट्रेचर, ईस्टर्न रिलिजनसारखे अनेक विषयांचं त्यांना ज्ञान होतं. त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या अभ्यासावरंच असायचं. १९२७ ला केवळ २३ व्या वर्षात त्यांनी केंब्रिजमध्ये पीएचडी पूर्ण केली. मात्र त्यांची आवड भौतिकशास्त्र या विषयामध्येच होती. पीएचडीनंतर ओपेनहायमर कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रोफेसर झाले. १९३० ते १९३१ दरम्यान त्यांनी स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून घेत. तेव्हाच त्यांनी भगवत गीता वाचली. त्यांना भगवद्गीतेचं भाषांतर वाचायचं नव्हतं म्हणून त्यांनी संस्कृत शिकून घेतलं. भगवद्गीता वाचल्यानंतर त्यांच्यात काय बदल झाले? हे १९३२ मध्ये त्यांनी त्यांच्या भावाला पत्र लिहून सांगितलं. यात त्यांनी कर्तव्य, शिस्त, माणूस म्हणून असलेली जबाबदारी, युद्ध आणि युद्धाच्या परिणामांची भीती याबद्दल सविस्तर माहिती दिली होती.
ओपेनहायमरची वाईट सवय
ओपेनहायमर नियमित धुम्रपान करत होते. त्यांना मित्रांमध्ये वेळ घालवणं जास्त आवडत नव्हतं. केवळ अभ्यासातच त्यांचं लक्ष असायचं. जगात काय चालू आहे? याचं त्यांना काहीच देणंघेणं नसायचं. परिणामी ते डिप्रेशनमध्ये राहत होते. त्यांनी त्यांच्या भावाला सांगितलं होत की, “I need physics more than friends”
ओपेनहायमर राजकीय दृष्ट्या सक्रिय
१९३० च्या सुरुवातीला जर्मनीमध्ये हिटलरचा उदय होऊ लागला होता. जर्मनीमध्ये हिटलरशाहीला त्रासून अलबर्ट आईन्स्टाईन, जॉन व्हॉन नॉयमान, लिओ झिलार्ड, हांस बेथे, एडव्हर्ट टेलर, एनरिको फेरणी या मोठ्या शास्त्रज्ञासहित अनेक जर्मन जुईश शास्त्रज्ञ जर्मनी सोडून अमेरिकेत पलायन करत होते. जर्मन जुईश शास्त्रज्ञावर होणाऱ्या अत्याचारांना पाहून ओपेनहायमर हळूहळू राजकीयदृष्ट्या सक्रिय होऊ लागले होते. कारण ओपेनहायमर स्वतः जर्मन जुईश शास्त्रज्ञ होते. ओपेनहायमर डाव्या विचारसरणीने प्रभावित होऊन अनेक राजकीय बैठकांमध्ये सहभागी झाले आणि काही कामगार संघटनाला पैसे दान केले. १९३६ मध्ये त्यांनी सांगितलं की, “राजकीय आणि आर्थिक घटनेचे परिणाम लोकांच्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम करतात? हे मला आता कळू लागलं आहे. त्यामुळे मी पण यात सहभागी झालं पाहिजे याची मला जाणीव झाली आहे.”
दुसरं महायुद्ध आणि अणुबॉम्ब
१९३९ मध्ये दुसरं महायुद्ध सुरु झालं. अमेरिका या युद्धात सहभागी होणार नव्हती. मात्र जर्मनमधून पलायन करून आलेल्या अल्बर्ट आईन्स्टाईन आणि लिओ झिलार्ड या शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या प्रेसिडेन्टला दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या १ महिन्याअगोदर एक पत्र लिहिलं होतं. जर्मनीमध्ये हिटलर अणुबॉम्ब बनविण्याच्या तयारीत असून अमेरिकेला यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे, असा सतर्कतेचा इशारा या पत्रात देण्यात आला होता.
हे पत्र वाचल्यानंतर अमेरिकन प्रेसिडेंटनी त्वरित हालचाल करत यासाठी आवश्यक शास्त्रज्ञ आणि सैन्य असे दोन समूह बनवले. तसेच एन्रिको फेरी आणि लिओ झिलार्ड यांना फंडिंग करण्यात आलं. युरेनियमच्या क्षमतेवर अभ्यास करून युरेनियमच्या सहाय्याने अवजार बनवता येते का? याच शोध लावणे हे या शास्त्रज्ञ समूहाचं काम होतं. या दोन्ही समूहाचे प्रमुख म्हणून ओपेनहायमर यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रोजेक्टचं नाव Manhattan project असं ठेवण्यात आलं. अणुबॉम्ब बनवणं शक्य आहे हे १९४२ मध्ये ओपेनहायमर यांच्या समूहाने निष्कर्ष काढले आणि तिथून पुढे ३ वर्ष त्यांनी आपलं पूर्ण लक्ष अणुबॉम्ब बनविण्यात लक्ष घातलं.
ओपेनहायमर आणि भगवद्गीता
या प्रोजेक्ट दरम्यान त्यांच्या सोबत काम करणाऱ्या लोकांना आपण चुकीचं करत असून होणाऱ्या नाशाला आपण जबाबदार असू, अशी भीती निर्माण झाली होती. तेव्हा भगवद्गीतामध्ये श्री कृष्णाने अर्जुनला स्वतःच्या नातेवाईकां विरुद्ध युद्ध करण्यास तयार करण्यासाठी जे श्लोक उच्चारले होते, तेच ओपेनहायमर त्यांना सांगत होते. मात्र अणुबॉम्बच्या चाचणीनंतर मात्र ओपेनहायमरचे मत बदलले होते. त्यांना आता विध्वंस दिसू लागला होता. मात्र जापानला धमकी देऊनही त्यांनी अमेरिकासमोर हार मानली नाही. यामुळेच अमेरिकेने जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला आणि जगाने पहिल्यांदा अणुबॉम्ब किती विध्वंस करू शकतं ते पाहिलं. यानंतर ओपेनहायमर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक लक्षवेधी वक्तव्य केलं, जे जग आजही विसरु शकतेलं नाही. ‘आता मी मृत्यू आहे… या जगताचा विनाशर्ता’ हेच त्यांचे उदगार.
ओपेनहायमरवर FBI तपास
दुसऱ्या महायुध्दानंतर शीतयुद्ध चालू झाले होते. यावेळी ओपेनहायमर यांनी हायड्रोजन बॉम्बच्या प्रकल्पाचं नेतृत्व करावं, अशी अमेरिकन सरकारचं म्हणणं होतं. मात्र हिरोशिमा आणि नागासाकीच्या स्फोटाला स्वतः जबाबदार असल्याचं आणि हे चुकीचं असून असं पुन्हा कधीच कोणत्या बॉम्बची निर्मिती आपण करायची नाही, असा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला लीड करण्यास नकार दिला. अमेरिकेत राहून अमेरिकन सरकारला पाठिंबा देत नाही म्हणून ओपेनहायमर यांच्यावर अनेक आरोप लावून त्यांना देशद्रोही ठरवण्याचं प्रयत्न देखील करण्यात आले. ते कम्युनिस्ट असल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना FBI सारख्या अनेक तपासाला सामोरं जावं लागलं. मात्र या तपासात त्यांचा कम्युनिस्टसोबत कुठलाच सबंध मिळाला नाही. मात्र तरीही त्यांच्याकडे असणारे सर्व सरकारी पदे काढून घेण्यात आले. यावेळी त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला होता आणि म्हणून त्यांना शास्त्रज्ञ महत्वाचं स्थान देतात.
ओपेनहायमर यांच्या जीवनाचा शेवट
ओपेनहायमर यांनी त्यांच्या जीवनाचे शेवटचे २० वर्ष अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सोबत काम केलं. धूम्रपानाचे शौकीन असणाऱ्या ओपेनहायमर यांचं निधन धूम्रपानामुळेच थ्रोट कॅन्सर होऊन १८ फेब्रुवारी १९६७ रोजी झालं.
संदर्भ :
१) BBC १६ जुलै २०२३ वेब
२) BBC २४ जुलै २०२३ वेब
३) धृव राठी युट्युब व्हिडीओ
४) बोल भिडू युट्युब व्हिडीओ