ऑनलाईन जगात जेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, तितकेच फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. वेगवेगळ्या प्रकारे लोकांची ऑनलाईन फसवणुक केल्याचे प्रकार रोज समोर येत असताना आता आणखी एक मोठा स्कॅम समोर आला आहे. Pink Whatsapp या नावाने अनेक जणांना गंडा घालण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत केंद्र सरकारने आणि काही राज्यातील सरकारने देखील लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
पिंक व्हॉट्सअॅप स्कॅम काय आहे? (What is Pink Whatsapp scam)
Whatsapp चा वापर आजकाल जवळपास सगळेच करताना दिसतात. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, मेसेजिंगसाठी Whatsapp सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणुन वापरलं जातं. याच अॅपचं नवीन अपडेट आलं आहे, असं सांगून लोकांना फसवलं जात आहे. न्यू पिंक लुक वॉट्सऐप विद एक्स्ट्रा फीचर्स’ (New Pink Look Whatsapp with extra Features) असा आशय असणारी लिंक Whatsapp वर युजर्सना पाठवली जाते. या लिंकवर क्लिक करुन नवीन फीचर्स असलेलं Pink Whatsapp डाऊनलोड करण्याचं सांगितलं जातं. मोबाईल मध्ये Pink Whatsapp इन्स्टॉल केल्यानंतर युजरच्या फोनमधील सर्व वैयक्तिक माहिती हॅकर्सकडून चोरली जाते. यामध्ये युजरची माहिती, फोटो, व्हिडीओ, एसएमएस, कॉन्टॅक्ट यासोबतच बँक अकाऊंटची माहिती आणि पासवर्डदेखील चोरी केला जातो.
Whatsapp चे अपडेटेड फीचर्स देण्याच्या नावाखाली अशा प्रकारे फसवणुक करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत इशारा दिला आहे.
पिंक व्हाट्सएपच्या लिंकवर क्लिक केल्यावर काय होते?
Pink Whatsapp च्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड झालेले अॅप इन्स्टॉल केल्यानंतर युजर त्यांच्या अकाऊंटवरील नियंत्रण गमावून बसण्याची शक्यता अधिक आहे. बऱ्याच वेळा हॅकर्स केवळ डेटा चोरी न करता मोबाइल फोन देखील हॅक करत आहेत. युजरच्या फोनमधील फोटो, व्हिडीओ सारखी माहिती चोरुन त्याचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे. बँक खात्याबाबतची माहिती चोरुन त्यावरील पैशांवर हॅकर्स डल्ला मारु शकतात. तसेच युजरच्या माहिती शिवाय त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना मेसेज देखील पाठवले जाऊ शकतात.
Pink Whatsapp Scam पासून बचावासाठी काय करावं? (How to protect phone from Pink Whatsapp)
- अशाप्रकारच्या ऑनलाईन फसवणुकींपासून वाचण्यासाठी कोणतेही अज्ञात Apps मोबाईलवर इन्स्टॉल करु नये.
- मेसेज किंवा इमेलवर मिळालेल्या अज्ञात लिंक्सवर क्लिक करु नये किंवा त्यावरील कोणतेही App/Software इन्स्टॉल करू नये.
- आपल्या मोबाईल फोनमध्ये कोणतेही App डाऊनलोड करण्यासाठी “प्ले स्टोर’ सारख्या अधिकृत स्थळाचाच वापर करावा.