सोशल मिडियाचा वापर वाढला तसा इन्फ्लुएंसर हा नवा प्रकार उदयाला आला. इन्स्टाग्राम रिलचा वापर वाढला तशी इन्फ्लुएंसरची लोकप्रियता अधिकच वाढत गेली. वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी इन्फ्लुएंसर सोबत काम करु लागल्याचं सध्या दिसतंय. मात्र येणारा काळ त्याही पुढे जात व्हर्च्युअल इन्फ्लुएंसरचा असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.(Virtual influencer in India) व्हर्च्युअल इन्फ्लुएंसर मोठमोठ्या ब्रँड्सला एका क्लिकवर त्यांना हवी तशी जाहिरात बनवुन देऊ शकतील. अशाच एका व्हर्च्युअल इन्फ्लुएंसरची निर्मिती भारतात करण्यात आली आहे. तिचं नाव आहे कायरा..
तंत्रज्ञानाचे नवनवीन आविष्कार आजकाल पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटायच्या त्या आता सहज शक्य झाल्या आहेत. एआय हा त्यातलाच एक प्रकार. चॅट जीपीटी सारख्या तंत्रज्ञानाची गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आणि सध्या चर्चा आहे ती व्हर्च्युअल इन्फ्लुएंसर असलेल्या कायराची.(Virtual influencer Kyra) भारतातील एका २६ वर्षीय तरुणाने एक नवीन तंत्र विकसित केलं आहे. या तंत्राला कायरा असं नाव देण्यात आलं आहे. ही कायरा व्हर्च्युअल इन्फ्लुएंसर आहे. अनेक कंपन्या स्वतःच्या प्रमोशनसाठी करत असलेल्या खर्च आणि वेळ कायरा वाचवू शकते. कायरा ही एक व्हर्च्युअल मेटा इंफ्लुअंसर आहे.
कायरा कोण आहे ? (Who is virual influencer kyra)
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर कायरा (kyraonig) या नावाचे एक अकाउंट असून या अकाउंट २ लाख १५ हजार लोक फॉलो करतात. अकाउंट बायोमध्ये कायराने स्वतःचा, “स्वप्ना मागे धावणारी, मॉडेल आणि ट्रॅव्हलर” असा उल्लेख केला आहे. ती मुंबई ची असल्याचंही यात नमूद केलं आहे. त्या सोबतच तिने बायोमध्ये स्वतःचा ई-मेल आयडी आणि यु-ट्यूबची लिंक पण दिलेली आहे.
कायरा काय करु शकते ?
व्हर्च्युअल इन्फ्लुएंसर असलेली कायरा मॉडेलिंग करते. एखाद्या कंपनीच्या प्रमोशनसाठी ती व्हिडीओ शूट देखील करु शकते. सोशल मिडीया इन्फ्लुएंसर, मॉडेल्स एखाद्या प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी ज्याप्रकारे काम करतात ती सर्व कामे कायरा अधिक चांगल्याप्रकारे आणि कमी वेळेत करू शकते.
सध्या कायरा तिच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. या अकाउंटवरुन ती स्वतःच्या लाईफस्टाईलबाबत माहिती देते, तीने अटेंड केलेल्या एखाद्या म्युझिक शो बद्दल तिची प्रतिक्रिया सांगते, तिचा अनुभव शेअर करते. कायरा योगा देखील करून दाखवते.
व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसर म्हणजे काय?
व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसर म्हणजे आभासी जगातील एक व्यक्ती. ज्या व्यक्तीला वास्तविक जगातील अनेक जण फॉलो करतात. त्या व्यक्तीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टला लाईक, कमेंट आणि शेअर पण करतात. व्हर्च्युअल इन्फ्लुएंसरच्या लाईफस्टाईल पासून प्रभावित होऊन त्यांच अनुकरण करू शकतात. अगदी एखाद्या रिअल लाइफ सेलिब्रिटीप्रमाणेच या इन्फ्लुएंसरला चाहते किव्हा फॉलोअर रिऍक्ट करत असतात.
व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसरचे फायदे :
व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसरला मानवी इन्फ्लुएंसर सारखं स्वतःला मेंटेन करायची आवश्यकता नाही. तीला एखादी गोष्ट करायला कधीच कुठलीही अडचण येणार नाही. जसे की, ती कधी आजारी पडणार नाही. तिला कधी ब्रेक घ्यावा, असं वाटणार नाही किंवा ती नखरे करणार नाही.
व्हर्च्युएल इन्फ्लुएंसरमुळे व्हॅनिटी व्हॅन, पर्सनल असिस्टन्स, मेकअप मन, मेकअप साहित्य, लाईट्स, कॅमेरा, आदींचा खर्चही वाचतो. त्यामुळे कामात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. याचा फायदा मॉडेल आणि इंफ्लुअंसरच्या सहाय्याने जाहीरात करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे.
‘कायरा‘ ला कोणी बनवलं?
हिमांशु गोयल या २६ वर्षीय चंदीगडच्या तरुणाने कायराची निर्मिती केली आहे. हिमांशूने अहमदाबाद येथून एमबीएचं शिक्षण घेतलेलं आहे. त्याने कायरा या व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसरला डिसेंबर 2021 मध्ये लाँच केले. कायराच्या सोशल मिडिया अकांउंट वरुन पहिली पोस्ट 28 जानेवारी 2022 ला केली गेली. त्यामुळे तोच तिचा वाढदिवस असल्याचं सांगितलं जातं.
कायराची कल्पना हिमांशूने विदेशातील व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसर पासून प्रेरित होऊन घेतली आहे. यापूर्वी कोरिया,जर्मनी सारख्या काहीं देशात व्हर्च्युअल मेटा इन्फ्लुएंसरचा वापर केला गेला आहे. आता या यादीत भारताचं देखील नाव जोडलं गेलं आहे.
हल्ली सोशल मिडिया इन्फ्लुएंसर बनण्याचा जणु काही ट्रेंड सुरु आहे. काही जणांनी तर चक्क चांगल्या पगाराची नोकरी सोडुन फुल टाईम इन्फ्लुएंसर बनण्याचा मार्ग स्विकारला आहे. मात्र आता कायरा सारख्या व्हर्च्युअल इन्फ्लुएंसरमुळे भविष्यात स्पर्धा आणखी वाढेल यात शंका नाही.