नवी दिल्ली : देशात आणि जगात मोबाईल फोनच्या बाबतीत आयफोनची खूप क्रेझ आहे. अशातच आयफोनबाबत (Iphone) भारतातील लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. टाटा समूह कर्नाटकातील विस्ट्रॉन कॉर्प कारखाना ताब्यात घेणार आहे. अॅपलने चीनबाहेर उत्पादन वाढवण्याची योजना आखलीये.
कराराचे मूल्य ६० करोड डॉलरपेक्षा जास्त
विस्ट्रॉनने (Wistron) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातून सुमारे ५० करोड डॉलर किमतीचे आयफोन निर्यात केले आहेत. ऑटोमोबाईलपासून सॉफ्टवेअरपर्यंतच्या व्यवसायांशी निगडित टाटा समूह (Tata Group) लवकरच विस्ट्रॉन या फॅक्टरीला खरेदी करण्याची चर्चा आहे. या करारानंतर भारतीय कंपनी आयफोन बनवण्याची ही पहिलीच वेळ असेल. या कराराचे मूल्य ६० करोड डॉलरपेक्षा जास्त आहे.
कामगारांची संख्या तिप्पट करण्याचे उद्दिष्ट
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, विस्ट्रॉन या फॅक्टरीमध्ये १० हजारांहून अधिक कामगार आहेत. ही विस्ट्रॉन फॅक्टरी कर्नाटकात आहे. राज्य सरकारकडून प्रोत्साहन मिळण्यासाठी चालू आर्थिक वर्षात या फॅक्टरीमधून सुमारे १.८ अब्ज डॉलर किमतीचे आयफोन पाठवण्याची कंपनीची योजना आहे. याशिवाय पुढील वर्षापर्यंत या फॅक्टरीतील कामगारांची संख्या तिप्पट करण्याचेही उद्दिष्ट आहे.
परदेशी कंपन्या कारखाने सुरू करण्याच्या विचारात
विस्ट्रॉनने देशातील आयफोन व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर टाटा समूह ही उद्दिष्टे पूर्ण करू शकेल. टाटा समूह, विस्ट्रॉन आणि अॅपलच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. Apple ला इतर प्रमुख पुरवठादारांमध्ये फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन यांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून आर्थिक सवलती देण्याच्या योजनेमुळे अनेक परदेशी कंपन्या आपले कारखाने सुरू करण्याच्या विचारात आहे.
यावर्षी आयफोनची नवीन सीरिज लॉंच होणार
आयफोनची नवीन सीरिज या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे. यावेळेस iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश असू शकतो. हे स्मार्टफोन iOS 17 वर चालतील. कंपनीला iPhones च्या नवीन सिरीजला जोरदार मागणी अपेक्षित आहे.