नवी दिल्ली : देशात सध्या दूरसंचार क्षेत्रात Jio आणि Airtel या दोनच कंपन्या टिकून असल्याचं पाहायला मिळतं. व्होडाफोन-आयडिया यांच्या VI कंपनीला देखील गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांना तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित करता आलं नाही. या तीन खासगी कंपन्यानंतर नंबर लागतो तो भारताची सरकारी दूरसंचार ऑपरेटर कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चा.
खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल गेल्या काही वर्षात बरीच मागे पडल्याचं दिसत आहे. जिओ-एअरटेल सारख्या कंपन्या 5G सेवा देऊन ग्राहकांना आकर्षित करत असतानाच्या काळात बीएसएनएल मात्र अजूनही 4G सेवेसाठी धडपडताना दिसत आहे. मात्र केंद्र सरकारने आता ही सेवा सुधारण्यासाठी मोठं पाऊल उचलल्याचं दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 7 जून रोजी सरकारी BSNL साठी 89 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएलला पुन्हा उभं करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.
BSNL साठी विशेष तरतूद
सरकारकडून मिळणाऱ्या या पॅकेजमुळे बीएसएनएलला 4G आणि 5G स्पेक्ट्रम खरेदी करण्यास मदत होणार आहे. बीएसएनएलला त्यांच्या सेवेसाठी 700 मेगाहर्टझ बँड लहरींचे वाटप करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. या बँडमुळे जास्त लोकसंख्येच्या क्षेत्रात देखील चांगली कवरेज पुरवता येते. सध्या भारतात केवळ जिओ कडे 700 मेगाहर्टझ बँडचा वापर करण्याची परवानगी आहे. आता जिओनंतर या बँडचा वापर करणारी बीएसएनएल ही दुसरी कंपनी असणार आहे.
खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत BSNL टिकणार का?
एक काळ होता की बीएसएनएलचं कनेक्शन मिळणं ही देखील मोठी कठीण गोष्ट होती. भारताच्या अनेक गावांमध्ये आजही बीएसएनएलचेच नेटवर्क मिळते. आजच्या घडीला मात्र जिओ, एअरटेल, व्ही अशा अनेक प्रायवेट कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल कुठेच असल्याचं दिसत नाही. बदलतं तंत्रज्ञान आणि वाढती स्पर्धा या काळात बीएसएनएल टिकाव धरु शकलं नाही. या कंपन्यांनी मागच्या काही वर्षात 4G सेवा देत ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले. जिओ-एअरटेल सारख्या कंपन्या भारताच्या अनेक मोठ्या शहरात सध्या 5G सेवा देखील देत आहे. बीएसएनएल मात्र अजूनही 4G सेवा देण्याची तयारीच करत आहे.
2019 मध्ये सरकारने बीएसएनएलला 69 हजार कोटींचे पॅकेज दिले होते. त्यानंतर 2022 मध्ये 1 लाख 64 हजार कोटींचे पॅकेज दिले होते. दुसऱ्या वेळेस पॅकेज दिल्यानंतर बीएसएनएलने गेल्या आर्थिक वर्षात 1500 कोटी रुपयांचा ऑपरेशनल नफा कमावल्याचं देखील सरकारकडून सांगण्यात येत आहे.
यापू्र्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) चे BSNL मध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या विलीनीकरणासह, BSNL ला अतिरिक्त 5.67 लाख किमी ऑप्टिकल फायबर नेटवर्क मिळाले, ज्याची व्याप्ती सुमारे 1.85 लाख ग्रामपंचायतींमध्ये पसरली होती.
BSNL पुन्हा उभं राहण का गरजेचं?
दुरसंचार मार्केटमध्ये सध्या दोन मोठ्या कंपन्यांची चलती असल्याचं पाहायला मिळतं. बीएसएनएल पुन्हा जोमात उभी राहिल्यास ग्राहकांना एक मोठा पर्याय उपलब्ध राहील. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या मनमानी रेट आणि वाईट सर्विसला चाप बसेल. बीएसएनएलचे पुनरुज्जीवन झाल्यास खासगी कंपन्यांना देखील त्यांच्या सेवेत सुधार करावा लागेल तसेच दरांवर नियंत्रण आणावं लागेल.