अॅपलच्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्सचा (Apple WWDC 23) भव्यदिव्य इवेंट काल पार पडला. यामध्ये अॅपलने व्हिजन प्रो हा मिक्स रिअॅलिटी हेडसेट सादर केला आहे. Apple Vision Pro असं नाव असलेला हा हेडसेट डोळे, आवाज आणि हाताच्या हालचालींद्वारे नियंत्रित करता येतो. 3D कंटेंट पाहण्यासाठी हे सर्वात चांगले प्रॉडक्ट असल्याचा अॅपलचा दावा आहे.
काय आहे Apple Vision Pro हेडसेट? (What is Apple vision pro?)
गेली अनेक दिवस अॅपलच्या बहुप्रतिक्षित व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटची चर्चा होती. सोमवारी पार पडलेल्या अॅपलच्या WWDC 23 या इवेंटमध्ये Apple Vision Pro हे मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट लाँच करण्यात आले. या हेडसेटद्वारे आभासी आणि वास्तविक अशा दोनही जगाशी एकाचवेळी कनेक्टेड राहता येतं. युजर दोन्ही पैकी जो मोड हवा त्यावर पूर्णपणे स्विच देखील करु शकतो. हा हेडसेट अॅपलच्या इतर प्रॉडक्ट सोबत पेअर देखील करता येतो.
Apple Vision Pro डोक्यावर लावल्यानंतर त्याची स्क्रीन डोळ्यांसमोर येते. या स्क्रीनवर मनोरंजनापासून गेमिंगपर्यंत वेगवेगळा कंटेंट पाहता येतो. स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टी डोळ्यांच्या हालचालींद्वारे नियंत्रित करता येईल. तसेच आवाजाद्वारे आणि हाताच्या हालचालींद्वारे देखील हेडसेट नियंत्रित करता येईल. (Apple vision pro features)
हेडसेटवर इमेज कॅप्चरसाठी एक फिजिकल बटन देखील देण्यात आले आहे. तसेच कानाच्या जवळ ऑडिओ पॉड देखील लावण्यात आलेले आहेत. यामुळे युजर स्क्रीनवर पाहत असलेल्या कंटेंटचा ऑडिओ त्याला ऐकता येईल.
या हेडसेटमधील मनोरंजनासंबंधित फिचर्स वापरताना युजरला मुव्ही थिएटरसारखा अनुभव मिळू शकतो. एखाद्या 4k टिव्हीपेक्षाही चांगल्या दर्जाचे व्हिडीओ या हेडसेटद्वारे पाहता येतील.
Apple Vision Pro हे हेडसेट वापरण्यासाठी आरामदायी बनवलेले आहे. या हेडसेटमध्ये मॅग्नेटिक क्लिप असेल. तसेच यात स्ट्रेचेबल फॅब्रिकचा वापर केला गेला आहे ज्यामुळे हेडसेट वापरताना युजरला आराम मिळेल. या हेडसेटमध्ये Apple च्या M2 चिपसेटचा सोबतच R1 चिपसेटचा देखील वापर केला गेला आहे.
बॅटरी क्षमता किती? (Apple vision pro battery)
या हेडसेटमधील बॅटरी जवळपास २ तास चालू शकते. तसेच पावर सोर्ससोबत कनेक्ट करुन हा हेडसेट हवा तितका वेळ वापरता येऊ शकतो.
किंमत किती असेल? (Apple vision pro price)
Apple Vision Pro या हेडसेटची किंमत ३४९९ अमेरिकन डॉलर इतकी असेल. भारतामध्ये साधारण ३ लाख रुपयांच्या जवळपास या हेडसेटची किंमत असु शकते. अॅपलचे हे प्रॉडक्ट २०२४ या वर्षापासून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असेल.