मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक क्रिकेट सेमीफायनलच्या तिकीटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आकाश कोठारी याला त्याच्या मालाड येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. या सामन्याच्या तिकिटांची 27 हजार ते 2.5 लाख रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. यासोबतच सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजारही वेगाने वाढला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 30 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आकाश कोठारी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान मुंबई पोलिसांना काही मेसेज मिळाले असून त्याच्याविरुद्ध काही कागदपत्रेही सापडली आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार आकाश कोठारीला जेजे पोलिस स्टेशनच्या पथकाने मुंबईच्या उत्तरेकडील मालाड येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेले मेसेज व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून अनेक ग्रुपमध्ये फिरवण्यात आले आहेत. या मेसेजनुसार या मॅचची तिकिटे 27 हजार ते 2.5 लाख रुपयांपर्यंत विकली जात आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तो तिकिटे त्यांच्या मूळ किमतीपेक्षा चार ते पाच पट अधिक दराने विकत होता. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 511 अंतर्गत फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. ही तिकिटे त्याने कुठून आणली याचा तपास सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी लोक सामील आहेत का, याचाही शोध पोलिस लवकर घेतील.