ICC : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. आयसीसीने वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर मार्लोन सॅम्युअल्सवर 6 वर्षाची बंदी घातली आहे. सॅम्युअल्स एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. आयसीसीने गुरुवारी सॅम्युअल्सवर बंदी घालत असल्याची घोषणा केली.
आयसीसीचे एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख एलेक्स मार्शल यांनी सांगितलं की, “सॅम्युअल्सने तब्बल दोन दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. यादरम्यान त्याने भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या अंतर्गत जबाबदाऱ्यांची कल्पना असतानाही अनेक भ्रष्टाचार संबंधित गोष्टीत भाग घेतला होता. सध्या तो निवृत्त झाला आहे. पण जेव्हा त्याने गुन्हे केले तेव्हा तो एक खेळाडू होता. सहा वर्षांची ही बंदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही खेळाडूसाठी सूचक इशारा म्हणून काम करेल”. (icc banned west indies cricketer marlon samuels)
आयसीसीने 2021 मध्ये लावले होते आरोप
आयसीसीने सप्टेंबर 2021 मध्ये सॅम्युअल्सवर आरोप लावले होते. यानुसार सॅम्युअल्सने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी कलम 2.4.2, 2.4.3 , 2.4.6 आणि 2.4.7 चं उल्लंघन केलं होतं. ही कलमं भ्रष्टाचारविरोधी अधिकार्यांना भेटवस्तू, पैसे, आदरातिथ्य किंवा इतर गोष्टींचा अहवाल न देण्यासंदर्भात आहेत, ज्यामुळे खेळाची प्रतिमा खराब होऊ शकते. यासोबतच तपासात सहकार्य न करणे, माहिती लपवून तपासात अडथळा आणणे किंवा विलंब करणे आदी कलमांचाही संबंध आहे.
आणखी वाचा – Vasai-Virar : पालघर जिल्ह्यात फिरतोय सीरियल रेपिस्ट; मुलींना व पालकांना सतर्क राहण्याचा इशारा
यावर्षी ऑगस्ट महिन्यात सॅम्युअल्स या सर्व आरोपांमध्ये दोषी आढळला. सॅम्युअल्सने 2019 मध्ये अबूधाबी टी10 लीगदरम्यान भ्रष्टाचारविरोधी नियम मोडले होते. टी10 लीगचं चौथा हंगाम 2019 जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात आला होता. सॅम्युअल्स तेव्हा कर्नाटक टस्कर्स संघाचा भाग होता. हाशीम आमला या संघाचा कर्णधार होता.
सॅम्युअल्स आणि वाद यांचं नातं जुनंच आहे. आयसीसीने 2008 मध्ये पैसे घेतल्याप्रकरणी आणि क्रिकटेची बदनामी केल्याप्रकरणी 2 वर्षांची बंदी घातली होती. 2015 मध्ये आयसीसीला त्याची गोलंदाजी अॅक्शन चुकीची आढळली होती. यानंतर 1 वर्षं त्याच्यावर गोलंदाजी करण्यासाठी बंदी होती.
सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजसाठी 71 कसोटी, 207 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 67 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या नावे तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारात 17 शतकांसह 11,134 धावा आहेत. त्याने 152 आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या आहेत. यादरम्यान, त्याने एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्वही केले. सॅम्युअल्सने 2012 आणि 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सॅम्युअल्स दोन्ही T20 विश्वचषक फायनलमध्ये सामनावीर ठरला होता.