आशियायी स्पर्धा 2023 मधे गुरुवारी वुशू मध्ये रोशिबिन देवीने रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकांचे खाते उघडले. त्यापाठोपाठ एयर पिस्टल 10 मीटर सांघिक गटात भारताने सुवर्ण वेध घेतला. अर्जुन सिंग चिमा, सरबज्योत सिंग आणि शिवा नरवाल यांच्या संघाने सर्वाधिक 1734-50x गुणांसह गोल्डन कामगिरी केली.
त्यानंतर भारताने आता घोडेस्वारीत ऐतिहासिक पदकाला गवसणी घातली आहे. 23 वर्षीय अनुष अगरवालाने त्याचा घोडा एट्रो यासह कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. त्याने 73.030 गुणांसह ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियायी स्पर्धेत ड्रेसेज प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
अनुषने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षीपासून घोडेस्वारीला सुरुवात केली होती. वयाच्या 17 व्या वर्षी तो आपले स्वप्न साकार करण्यासाठी जर्मनीला गेला. तेथे त्याने जर्मन ऑलम्पियनपटू ह्युबर्टस यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.