मुंबई : पुण्याचे तात्या आज मुंबईमध्ये सामनाच्या कार्यालयात जाऊन संजय राऊत यांना भेटले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे Vasant More हे अनेक सूचक वक्तव्य करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील स्पष्टपणे बोलून दाखवली आहे.
गुरुवारी वसंत मोरे यांनी थेट शरद पवारांची जाऊन भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी मुंबईला जाऊन सामनाच्या कार्यालयात संजय राऊत यांच्याशी अर्धा तास चर्चा केल्याच देखील समजते आहे. संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य करताना स्पष्ट नाव न घेता भाजपवर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा वसंत मोरे म्हणाले की, ” अजून भेटीगाठी सुरू आहेत. मागच्या दाराने मी भेटत नाहीये. थेट जाऊन भेटतोय, सगळ्या चर्चा सकारात्मक होत आहेत. सर्वच जण विचार करतील. शरद पवारांना भेटलो, काँग्रेसकडे जागा आहे. मोहन जोशींना भेटलो. रवींद्र धोंडेकरांसोबत फोनवरून बोलणं झालंय. पुण्यात गेल्यावर भाऊला भेटेल. ” असं वसंत मोरे यावेळी म्हणाले आहेत.
भाजपवर थेट नाव न घेता यावेळी वसंत मोरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की मनसेची भाजपासोबत युती होणार का या प्रश्नावर उत्तर देताना वसंत मोरे म्हणाले कि, ” मनसे या विषयावर मी बोलू इच्छित नाही. पुण्यात वॉशिंग मशीन नको, मी सुद्धा याच मताचा आहे. मी ज्या कारणासाठी पक्ष सोडला त्या मुद्द्यावर आता मी काम करत आहे. पुण्यातील नागरिकांच्या हितासाठी मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. पुण्यात हुकूमशाही सारखं वातावरण आहे. त्या विरोधात मी काम करतोय. ” असे यावेळी वसंत मोरे म्हणाले आहेत.