साताऱ्यातील भोसले घराण्यातील दोन नेत्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टीवरून वाद झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. कालांतराने काही काळासाठी ते एकत्रही येतात. मात्र काल २१ जूनला साताऱ्यात या दोन नेत्यांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे दिसले. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही भाजपच्या नेत्यांमध्ये जमिनीच्या मालकीवरून वाद झाला. यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे समर्थकही आपसात भिडले होते. (Clash between Udayanraje Bhosale and Shivendra raje Bhosale)शाब्दिक बाचाबाची आणि जोरदार घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. वेळीच घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त लावल्याने मोठा वाद टळला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय होत?
काल २१ जुनला शिवेंद्रराजे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रस्तावित जागेवर भूमिपूजन करायचे होते. पुणे-बंगळुरू महामार्गाच्या साताऱ्यातील खिवंडीतील शिवराज ढाब्याजवळील जमिनीवर हे भूमीपूजन होणार होते. सकाळी १० वाजता हा भूमिपूजन सोहळा शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते होणार होता. मात्र सकाळी ९ लाच या ठिकाणी उदयनराजे भोसले जेसीबी घेऊन कार्यकर्त्यांसोबत आले. या ठिकाणी शिवेंद्रराजेंनी तात्पुरता कार्यालय म्हणून एक कंटेनर ठेवलेला होता. हा कंटेनर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी मिळून पलटवला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने हा कंटेनर तोडण्यात आला.
सकाळी १० वाजता शिवेंद्रराजे या ठिकाणी आले. तेव्हा उदयनराजे तिथे हजर होते. उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवेंद्रराजे यांनी नारळ फोडून भूमीपूजन केले. या वेळी दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते आणि जोरदार घोषणाबाजीही सुरु होती. मात्र वेळेतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांमध्ये पोलिसांची साखळी बनवली. पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली.
वाद कशामुळे झाला? (Why Clash between Udayanraje and Shivendraraje)
सातारा शहरानजीक पुणे-बंगळुरू महामार्गावर १६ एकर जमीन आहे. या जागेचे मुळ मालक खासदार उदयनराजे भोसले आहेत. या जागेवर कुळ असून गेली अनेक वर्षे ते ही जमीन कसत होते. शिवेंद्रराजे भोसले यांचे वडील अभयसिंहराजे भोसले यांनी मंत्री असताना या जागेवर बाजार समितीसाठी आरक्षण टाकले होते. चौदा वर्षापूर्वी ही जागा बाजार समितीसाठी नक्की झाली. हे प्रकरण अनेक वर्षे कोर्टात प्रलंबित होतं. नंतर सर्वोच्च न्यायालयाने ही जमीन बाजार समितीला देण्याचा निर्णय दिला. याच बाजार समितीसाठी भूमीपूजन करताना काल हा वाद झाला.
शिवेंद्रराजे यांची बाजू काय आहे?
परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही नेत्यांशी संवाद साधल्यानंतर शिवेंद्रराजे पोलिसांना म्हणाले,
आमचा रीतसर मार्केट कमिटीवर ताबा आहे. ज्यांचा कोणाचा या जागेला विरोध आहे त्यांनी या प्रकरणावर कायदेशीर स्थगिती दाखवावी. नुसतं कुठं तरी केस दाखल आहे आणि पेंडिंग आहे म्हणून स्टे येत नाही हे आपल्याला पण माहिती आहे. आपण पण या आधी सगळ्यांना SP कार्यालयात बोलावलं होत. तेव्हा कोणीही आलं नाही. कोणतेही कागदपत्र दाखविले नाही. साहेब आमच्या नावावर उतारा आहे. आम्ही पोलिसांना सगळी कागदपत्रे दिलेली आहेत. मार्केट कमिटीच्या नावावर उतारा आहे. कलेक्टरनी आमच्या नावावर सातबारा केला आहे.
या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की,
शेतीउत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभा करण्यासाठी शासनाकडून ही जमीन ताब्यात घेऊन देण्यात आलेली आहे. या जमिनीसाठी लागणारे पैसे मार्केट कमिटीने भरले आहेत. त्याचबरोबर या जमिनीसाठी लागणाऱ्या सगळ्या कायदेशीर गोष्टी केलेल्या आहेत. सातबारा आमच्या मार्केट कमिटीच्या नावावर आहे. मागच्या वर्षभर प्रशासक असल्यामुळे आम्हाला या मार्केटचे काम सुरु करता आले नाही. आता झालेल्या निवडणुकीत आम्ही घोषणा केली होती की, निवडणूक झाल्यानंतर आम्ही सातारा तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज मार्केट बनवणार.
उदयनराजे यांची बाजू काय आहे?
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे आमनेसामने आल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उदयनराजे पोलिसांना म्हणाले,
या लोकांनी कोणीही माझ्या प्रॉपर्टी वर पाय ठेवायचा नाही. मग विक्रम असो किंवा कोणीही असो. तुम्ही त्या सगळ्यांना अटक करा आणि त्यांना तुम्ही ताकीद द्या. ज्यांना हवं त्यांना डोंगरावर बसूद्या, महामार्गावर बसूद्या पण इथं जायचं नाही. त्यांचं ऑफिस त्यांनी त्यांच्या ताब्यात मांडव्याला नेवून टाकावं, माझ्या जागेत कश्याला? माझ्या जागेत जी वस्तू ती माझी वस्ती न. सरळ सरळ आहे. जागा कोणाच्या मालकीची आहे? हे योग्य नाही, आमचं SLP सुप्रीम कोर्ट मध्ये पेंडिंग असताना तुम्ही असं करताय.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले,
जागा माझ्या मालकीची आहे. त्या जागेवर अल्पभूधारक म्हणून राहणारे सगळी लोक हे कुळ आहेत. जवळपास ६० वर्ष आर्मी मध्ये ही लोक होती. आज तुम्ही इथे येऊन दगड ठेवणार, नारळ आणणार, फटाके फोडणार. पण त्या जागेवर कोर्टाचा स्टे आहे. आणि पोलीस त्यांना मदत करत आहे. उद्या उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस येणार आहे. तर निश्चितपणे हे सगळं ड्राफ्टच्या रूपात तयार करून त्यांच्या समोर मांडण्यात येईल.