मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक ही सर्वांसाठीच प्रतिष्ठेची झाली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही लढाई आता प्रतिष्ठेची झाली आहे. दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये अशाच पद्धतीची प्रतिष्ठेची लढाई आता लढली जाणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांचा अर्थात खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या दहा वर्षांपासून ते कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. अशातच महायुतीने त्यांची उमेदवारी जाहीर करण्यास मोठा कालावधी घेतला. त्यामुळे देखील शिवसेना एकनाथ शिंदे गटाला टीकेचा धनी बनावे लागले.
आता कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हे श्रीकांत शिंदे आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर या जोरदार प्रचार देखील करत आहेत. असं असताना आता उद्धव ठाकरे यांनी नवीन राजकीय डाव टाकला आहे. ठाकरे गटाने आणखीन एक उमेदवारी अर्ज दाखल केला असून ह्या उमेदवारी अर्ज माजी महापौर रमेश जाधव यांच्या वतीने दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाकरे गट सहा तारखेला एबी फॉर्म बदलणार अशी शक्यता देखील राजकीय सूत्रांनी वर्तवली आहे. एकंदरीतच कल्याण लोकसभा मतदारसंघाची ही लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे.