कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2024 चे Lok Sabha Elections 2024 निकाल जाहीर झाले आणि त्यानंतर मोदी लाट ओसरल्याचं पाहायला मिळाल आहे. महाराष्ट्रमध्ये अनपेक्षित पणे महाविकास आघाडीने जोरदार टक्कर देत तब्बल 33 जागांवर विजय मिळवला तर अपक्ष विशाल पाटील यांनी देखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
एकंदरीत वारं बदलल आहे. गेल्यावेळी देखील ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या पावसातल्या भाषणामुळे अवघ्या एका दिवसात राजकीय परिस्थितीने रुख बदलला होता. पण या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार निवडीपासून ते निकाल लागेपर्यंत सर्व हालचाली एवढ्या शांतपणे झाल्या की आता कोल्हापूरमध्ये यावरूनच तिखट असा फलक झळकतो आहे. या फलकावर लिहिला आहे, ” सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलय कुठे ? ” कोल्हापूरच्या भर चौकामध्ये लावण्यात आलेल्या या फलकाने कोल्हापूरकरांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोल्हापूरच्या स्टॅन्ड परिसरात लावण्यात आलेला बॅनर युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला असल्याचे समजते आहे.
अजित पवारांनी काका शरद पवार यांची साथ सोडली आणि त्यानंतर अनेक आमदारांनी देखील अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्ग बदलला होता. यामध्ये कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील यांचा देखील समावेश होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी उभे राहून जोरदार प्रचार देखील केला. पण तरीही मंडलिक यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. कोल्हापुरासह बीड ,अहमदनगर, बारामती, माढा, शिरूर या मतदार संघामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचा दबदबा आणि त्यांचा अनुभव यामुळे राजकारणात एका रात्रीतून काहीही होऊ शकतं याचीच पुन्हा प्रचिती आली आहे.