Rahul Gandhi: टीम इंडियाने वर्ल्ड कप हारल्यानंतर संपूर्ण देशातील क्रिडाप्रेमींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारताच्या पराभवानंतर यावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या चर्चा आणि मीम्स व्हायरल होत आहे. प्रत्येक जण भारताच्या या पराभवावर आपले मत व्यक्त करत आहे. इतकंच नव्हे तर टीम इंडिया हरण्याची अनेक कारणे सांगितली जात आहे. सोशल मीडियात यूजर्स अनेकजण कोणत्या ना कोणत्या खेळाडूला जबाबदार धरत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात विधान केले आहे. (rahul gandhi held indian cricket team panauti responsible for india pm modi world cup 2023)
राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी यावेळी ते जालोर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचा उल्लेख केला. सध्या राहुल गांधींचा वर्ल्ड कप पराभवावर भाष्य करणारा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यात त्यांनी पराभवासाठी ‘पनवती’ला जबाबदार धरले आहे. आपण चांगले जिंकत होतो, पण पनवतीमुळे आपण हरलो असे राहुल गांधी या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.
काय म्हणाले राहुल गांधी
कॉंग्रेसच्या ट्विटर हॅंडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. यामध्ये राहुल गांधी भाषण करत असताना स्टेजखालून लोकांनी पनवती-पनवती अशी घोषणाबाजी सुरू केली. यावर राहुल गांधी यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले की, ‘आमची पोरं तिथे वर्ल्ड कप जिंकू शकली असती, पण पनवतीमुळे आम्हाला हरवलं. टीव्हीवाले हे तुम्हाला सांगणार नाहीत, पण जनतेला माहीत आहे’, असे राहुल गांधी म्हणाले.
पाहा…नेमकं काय म्हणाले राहुल गांधी
मोदी लक्ष विचलित करतात, अदानी खिसे कापतात
तुमचे लक्ष दुसरीकडे वळवणे हे मोदींचे काम आहे. आणि तुमचे खिसे कापणे हे अदानींचे काम आहे. दोघे येतात, एक टीव्हीवर येतात. ते तुम्हाला हिंदू-मुस्लिम सांगतील, कधी क्रिकेट मॅचला जातील. ते तुमचे लक्ष विचलित करत आहेत. अदानी तुमचा खिसा कापत आहेत. सर्व योजना अदानींसाठीच आहेत असं देखील राहुल गांधी म्हणाले.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, वर्षभरापूर्वी मी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला होता. लाखो लोकांसह काश्मीरमध्ये 4500 किलोमीटर चाललो. पाऊस, वादळ, बर्फात चाललो. उद्देश भारताला एकसंध करण्याचा होता. भाजप देशात द्वेष पसरवत आहे. हिंसाचार पसरवत आहे. हे एका जातीला दुसऱ्या जातीशी आणि एका धर्माच्या लोकांना दुसऱ्या धर्माच्या लोकांशी लढायला लावत आहे. म्हणूनच आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली. सध्या या व्हिडिओमुळे एकच चर्चा सुरु आहे.