पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्षाचे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्याचे घोषित केल्यानंतर त्याचे पडसाद दोन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पडत आहेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादी भवनावर अजित पवार गटाकडून हक्क सांगितला जात असताना आता पुण्यामध्ये देखील असाच वाद होऊ शकतो अशी चिन्हे आहेत. दरम्यान खबरदारी म्हणून पुणे पोलिसांचा मोठा फौज फाटा पुणे राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आला आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याची खबरदारी म्हणून पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशांत जगताप यांना माध्यमांनी याप्रकरणी सवाल उपस्थित केला. यावर त्यांनी सांगितले की, ” शहर कार्यालय हे त्यांच्या नावावर असल्यामुळे अजित पवार गटाला कायदेशीर दावा करता येणार नाही. ही जागा भाडेतत्त्वावर घेतली असल्याकारणामुळे अजित पवार गटाला दावा करता येणं शक्य नाही. अशी माहिती जगताप यांनी दिली आहे.